कंत्राटी सफाई कर्मचारी, घंटागाडी यांना शासन नियमानुसार किमान वेतन मिळावे.सफाई मजुरांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२१
कंत्राटी सफाई कर्मचारी, घंटागाडी यांना शासन नियमानुसार किमान वेतन मिळावे याकरिता पाचोरा येथील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे पाचोरा नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक ०१ जानेवारी २०२२ शनिवार पासून उपविभागीय अधिकारी भाग पाचोरा यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे आरोग्य विभाग ई~निविदा सुचना क्र.३५ई टेंडर आय.डी. २०२१ डी.एम.ए. ७४५६७४१ जावक क्रमांक./आरोग्य/२०१८/ सन २०२१ दिनांक ०९/१२/२०२१ च्या निवेदनाद्वारे किमान वेतनासाठी या अगोदर दिनांक ३१/०७/२०१९ रोजी तसेच सन २०२० मध्ये ई~निविदा व्यवस्थापन ओला व सुका कचरा, रस्ते सफाई, नाली,गटार सफाई, घंटागाडी यासर्व कामांना एकसमानतेने किमान वेतना प्रमाणे प्रत्येक कामगारास १२४८८/०० रुपये वेतन ही मागणी केली होती. तसेच या आशयाच्या मागण्या नगरपरिषदेने दिनांक १३/०९/२०२० च्या पत्रानुसार मान्यही केल्या होत्या असे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने प्रसार माध्यामांना माहिती देतांना सांगितले आहे.
परंतु आजपावेतो नगरपरिषदेने मान्य केलेल्या मागण्यांची पुर्तता झालेली नसल्याने, मजदूर युनियनने समजदारी दाखवत ई~निविदे नुसार नगरपरिषदेकडून कामगारांना काम देणे किंवा मजूरी देणे शक्य नसल्यास नगरपरिषदेने स्वताचे आधिपत्याखाली सफाई कर्मचाऱ्यांना (कामगारांना) शासकीय मस्टरवर दैनंदिन नोंद करून ३००/०० प्रती दिन हजेरी दिली तरी चालेल व आमच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करून कामगारांच्या बाजुने निकाल द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच आमच्या समस्या व मागणी समजून न घेता आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पाचोरा नगरपरिषदेच्या विरोधात शनिवार दिनांक~०१/०१/२०२२ पासून पाचोरा उपविभागीय अधिकारी भाग पाचोरा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असून याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची असेल असे निवेदनात नमुद केले असून निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मा. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग. मुंबई, मा. उपविभागीय अधिकारी भाग पाचोरा, मा.तहसीलदार साहेब पाचोरा व मा.पोलिस निरीक्षक साहेब पाचोरा पोलिस स्टेशन यांना पाठवल्या आहेत.