पिंप्री (डांभुर्णी) धरण परिसरातील ३२ शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाच्या केबल वायरची चोरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंप्री (डांभुर्णी) धरण परिसरातील ३२ शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाच्या केबल वायरची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत डांभुर्णी येथील शेतकरी संतोष नवलसिंग परदेश यांनी अज्ञात केबल वायर चोरट्यां विरोधात पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी, पिंपरी येथील ग्रामस्थ हे शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवतात याकरिता हे शेतकरी दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेऊन पिंप्री धरणातून शेतातील पिकांना पाणी उचल करुन रब्बीची पिके घेतात. या पिकांना पाणी भरण्यासाठी विद्यूत वितरण कंपनीकडून रीतसर विद्यूत कनेक्शन घेऊन धरण परिसरातील ट्रान्सफॉर्मरुन आपापल्या शेतातील विद्रूप मोटारींचा विजपुरवठा घेण्यासाठी केबल वायर वापरतात. हंगमी पिके घेत असतांनाच विद्यूत वितरण कंपनीच्या मनमानी पणाला वैतागून जेव्हा, जेव्हा विद्यूत पुरवठा मिळेल तेव्हा, तेव्हा कधी रात्रीच्या अंधारात तर कधी दिवसा पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात जात असतात.
अश्याच संघर्षमय परिस्थितीत शेतकरी प्रयत्नशील असतांनाच काही शेतकरी नियमीतपणे दिनांक १९ एप्रिल २०२२ सोमवार रोजी शेतात जाऊन आपापल्या विद्युत पंपाच्या मोटारी सुरु करण्यासाठी प्रयत्न केले मात्र विद्यूत पंप सुरु होत नसल्याने जलसाठ्याकडे जाऊन पाहिले असता ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) पासुन तर विद्रूप मोटारींपर्यंतच्या केबल वायर जागेवर नसल्याचे दिसून आले. म्हणून संपूर्ण धरण परिसरात फिरून पाहिले असता जवळपास ३२ शेतकऱ्यांच्या केबल वायरची चोरी झाल्याचे दिसून आले.
हि बाब लक्षात येताच संतोष नवलसिंग परदेशी यांनी लगेचच भ्रमणध्वनीवर इतर शेतकऱ्यांना सदरची परिस्थिती सांगितली व सर्व शेतकऱ्यांनी धरण परिसरात येऊन पाहिले असता गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. कारण आता कडकडीत उन्हात रब्बीची पिके शेवटच्या टप्प्यात आहेत व याच कालावधीत पिकांना पाणी देण्यासाठी गरजेचे असतांनाच केबल वायर चोरी गेल्यामुळे व हातात पैसा नसल्याने दुष्काळात तेरावा महिना या म्हणी प्रमाणे प्रसंग ओढवला आहे.
या चोरीच्या घटनेबाबत संतोष परदेशी व संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करुन घेत या तक्रारीची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक या. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पिंप्री धरण परिसरात घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहाणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत काही मार्गदर्शनपर सुचना केल्या व रात्री बे रात्री पिकांना पाणी भरतांना विद्रूप पुरवठ्यापासून तसेच साप, विंचू व जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्यासाठी सुचत केले.