पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. चाळीसगाव पोलीसांच्या कारवाईत तारखेडा येथील गोडाऊन मधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२३
सगळीकडे राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटखा, सुगंधित पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही आज राज्यात सगळीकडे या शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची काही ठिकाणी दिवसाढवळ्या तर काही ठिकाणी चोरी, चोरी, चुपके, चुपके गुटखा विक्री सुरुच आहे. यामागील कारण जाणून घेतले असता बऱ्याचशा ठिकाणी या अवैधरित्या गुटखा विक्री करणारांना राजाश्रय मिळत असल्याने तसेच काही ठिकाणी पैश्याच्या बळावर स्थानिक गावगुंडांचा आश्रय घेऊन पानटपरी, किरणा दुकाने, उपहारगृहातून तसेच भटकंती करत दिवसाढवळ्या गुटखा विक्री सुरुच आहे.
अश्या गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होतांना दिसून येत आहे. अशीच एक कारवाई दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजीच्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील तारखेडा या गावी करण्यात आली असून या कारवाईत तब्बल २६ लाख ८६ हजार ३६८ रुपयांचा अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे एका गोडाऊन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा भलामोठा साठ असल्याची गुप्त माहिती खबऱ्या कडून चाळीसगावचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्री. अभयसिंग देशमुख यांना मिळाल्यावर त्यांनी आपल्या खबऱ्या कडून खात्री पटवून घेत पुढील कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करुन दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिस काॅन्स्टेबल अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, पोलिस नाईक राजेंद्र अजबराव निकम यांना सोबत घेऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास तारखेडा गाठले.
तारखेडा गावात पोहोचल्यावर तपास करत असतांनाच एका गोडाऊन समोर बसलेल्या इसमाला हे गोडाऊन कुणाच्या मालकीचे आहे म्हणून विचारपूस केली असता त्याने अनिल काशिनाथ वाणी यांचे नाव सांगितले खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याची खात्री झाल्यावर अनिल वाणी यांना बोलावून घेत गोडाऊनची झाडाझडती घेतली असता राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याचा भलामोठा साठ दिसून आला याबाबत अनिल वाणी यांना विचारणा केली असता हा गुटख्याचा माल दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांचा मी फक्त विक्री करतो असे सांगितले संबंधित गोडाऊन मध्ये गुटखा मिळुन आल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक मा. श्री. अभयसिंग देशमुख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला खबर देऊन तात्काळ हजर होण्याचे सांगितले.
सूचना मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे साहेब यांनी सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे, योगेश गगणे यांना सोबत घेऊन तारखेडा येथील घटनास्थळी जाऊन अनिल वाणी यांना ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन विमल पान मसाल्याचे प्रत्येकी २०८ पाकिटे भरलेली ४८ पोती प्रत्येक पाकिटात प्रत्येकी ८५००/०० ते ९९००/०० रुपये किंमतीचे २२ पाऊच, व्ही १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकिटे व एका पाकिटात ११ पाऊच एका पाऊचची किंमत २ रुपये, ४ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची राज निवास सुगंधीत पान मसालाचे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकिटे व एका पाकिटात ४८ पाऊच एका पाऊचची किंमत ४ रुपये, २ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ७ गोण्या एका गोणीत १ हजार ६५० पाकीटे व एका पाकिटात २२ पाऊच एका पाऊचची किंमत १.५ रुपये, ५६ हजार १६० रुपये किंमतीचे सागर पान मसालाचे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकिटे व एका पाकिटात १२ पाऊच एका पाऊचची किंमत १८ रुपये असा एकुण २६ लाख ८६ हजार ३८६ रुपयांचा अवैधरित्या साठवुन तसेच विक्रीसाठी ठेवलेले राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला असून अनिल वाणी यांना ताब्यात घेतले असले तरी दिलीप वाणी व गोकुळ वाणी हे दोघ संशयित आरोपी फरार आहेत. पुढील तपास व आरोपींचा शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मा. श्री. जितेंद्र वल्टे, योगेश गगणे करीत आहेत.
(पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है.)
————————————-
पोलिस विभागातर्फे तारखेडा गावात एका ठिकाणी छापा टाकून गुटखा पकडल्याची वार्ता पाचोरा शहरासह तालुक्यातील गावागावात माहीत पडताच पाचोरा शहरातील जवळपास चाळीस टक्के पान टपऱ्या काही मिनिटातच फटाफट बंद झाल्याचे दिसून येते होते. तर काही किराणा दुकानात मालक व कर्मचारी धावपळ करत असतांना दिसून आले व त्यांनी त्यांच्या दुकानातील असलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावून हात झटकले.
तारखेडा गावात कारवाई झाली असली तरी भुकंप पाचोरा शहरात झाल्याचे जाणवते कारण आज व आत्ताच्या परिस्थितीत सुध्दा पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवणूक व विक्री सुरुच असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पाचोरा शहरात एका गुटखा किंगचे नाव लहानमोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. परंतु आजपावेतो या गुटखा किंगवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने हा गुटखा किंग पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुक्यातील गावागावात गुटखा विक्री करत आहे. तसेच संबंधित गुटखा किंगचे गल्ली ते दिल्ली कनेक्शन असल्याने कायद्याच्या रक्षकांना इच्छा असुनही कारवाई करता येत नसल्याची चर्चा आहे. ही परिस्थिती पाहता “पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही असे वाटते.