रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणून वरखेडी पाचोरा दरम्यान उद्या खड्डे पूजनाचा कार्यक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१०/२०२२
“रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे मोठ, मोठे फलक लावून जाहीरात केली जाते व याकरिता लाखो रुपये खर्च केला जातो परंतु रस्त्यावरुन प्रवास करतांना रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने हे लावलेले फलक म्हणजे जनतेची अक्षरशा केलेली फसवणूकच असल्याचे लक्षात येते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण कोणतेही स्वयंचलित वाहने घेतांनाच वाहनधारकांकडून आजीवन एकरकमी पथ कर म्हणजे (रोड टॅक्स) वसूल केला जातो. मग हा पैसा जातो कुठे हा कळीचा मुद्दा आहे.
कारण याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जामनेर ते पाचोरा रस्त्यावर शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्याची झालेली चाळण पाहून अक्षरशा रडकुंडीला आलेल्या वाहनधारकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी घेतल्या तर नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाची व लोकप्रतिनिधींची नाचक्की होईल म्हणून आम्ही त्या प्रतिक्रिया बातमीत जनतेसमोर मांडण्याचा विचार तुर्तास टाळतो आहोत.
जामनेर ते पाचोरा रस्त्यावर शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान डांबरीकरण असलेला रस्ता दाखवा व बक्षीस मिळवा असे फलक लावले तरी ते शोभून दिसतील कारण शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांची दुरुस्ती व्हावी म्हणून जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेत सत्यजित न्यूज कडून वारंवार आवाज उठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तरीही कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरतेशेवटी लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी लोकप्रतिनिधींसाठी सत्यजितच्या माध्यमातून (खड्डा चुकवा व बक्षीस मिळवा) अशी शर्यत लाऊन बक्षीस जाहीर केले होते तरीही लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आजपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जबाबदार लोकप्रतिनिधी हे या रस्त्याच्या नुतनीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान, मोठे अपघात होऊन दररोज कित्येक वाहनधारक जखमी होत आहेत तर काही वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. तसेच एस. टी. बस व स्वमलाकीच्या चारचाकी वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असून सोबतच कंबरदुखी व पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने वाहनधारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रसारमाध्यमांनी रस्त्याच्या नुतनीकरणासाठी वारंवार आवाज उठवून सुध्दा काहीएक फायदा होत नसल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर व पाचोरा यांना कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी व त्यांच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी सरतेशेवटी म्हणजे उद्या दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रविवार रोजी सकाळी दहा वाजता वरखेडी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर असलेल्या खड्यांचे गुलाल, अगरबत्ती लाऊन व श्रीफळ वाढवून पुजन करण्यासाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी या रस्त्यावरून जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनधारकांनी जास्तीत, जास्त संख्येने खड्डे पुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तीव्र निषेध नोंदवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संतप्त वाहनधारक व प्रवाश्यांनी केले आहे.
विशेष टिप ~
या खड्डे पुजनाच्या कार्यक्रमाचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला जबाबदार लोकप्रतिनिधी व संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्यास त्यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(क्रमशः पुढील बातमी
मर्जीतील ठेकेदार, रस्त्याच्या कामात भ्रष्ठाचार)