आर्थिक परिस्थितीला कंटाळून डांभुर्णी येथील ३३ वर्षीय युवकाची आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या डांभुर्णी येथील एका ३३ वर्षीय युवकाने आर्थिक परिस्थितीला कंटाळून कोणतेतरी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ०७ मार्च २०२३ मंगळवार रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या डांभुर्णी गावात मयत रमेश शांतीलाल परदेशी वय वर्षे ३३ हा युवक वडील शांतीलाल परदेशी, आई सौ. शोभाबाई परदेशी, पत्नी सुनीता परदेशी व मुलगी श्रध्दा वय साडेसहा वर्षे व मुलगा राहुल (लकी) वय पाच वर्षे यांच्यासह एकत्रित कुंटुबात रहात होता. मयत रमेश परदेशी हा वडिलोपार्जित असलेली तीन एकर शेती जमीनीवर काबाडकष्ट करुन तसेच मिळेल तसे रोजंदारीवर काम करुन आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. असेच जीवन जगत असतांनाच कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात राब, राब राबून शेतीमाल हातात येत नव्हता तर दुसरीकडे कौटुंबिक खर्च, कधी आजारपण व इतर खर्च भागत नसल्याने मयत रमेशचे वडील शांतीलाल परदेशी व आई सौ. शोभाबाई व पत्नी सुनीता हेही मोलमजुरी करुन संसाराला हातभार लावत होते.

आपल्याकडे थोडीच शेत जमीन आहे. एवढ्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणार नाही म्हणून मयत रमेशने आई सौ. शोभाबाई परदेशी यांच्या नावावर कोटक महेंद्रा बँक लिमिटेड कडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला होता. मात्र तेथेही नशिबाने साथ दिली नाही. कारण उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे आटोपल्यानंतर ट्रॅक्टरला पाहिजे तेवढी कामे मिळत नव्हती व कामे होती परंतु चोरुन वाळु वाहतूक करणे, गौण खनिज उत्खनन व वाहतूक तसेच लाकुड वाहतूक करणे हे मतत रमेशला मान्य नव्हते अश्यातच शेतातील शेतीमाल पिकत नव्हता तर जेमतेम शेतीमाल हातात आलातर त्यालाही योग्य भाव मिळत नसल्याने ट्रॅक्टरचे हप्ते भरणे अवघड झाले होते.

याच बिकट अवस्थेत असतांनाच दीड वर्षांपूर्वी थकीत कर्जापोटी कोटक महेंद्रा बॅंकेने ट्रॅक्टर ओढून नेला होता. यामुळे अधुनमधून ट्रॅक्टरच्या भाड्यातून मिळणारे थोडेफार उत्पन्नही थांबले. याच कालावधीत वडील आजारी पडले त्यांच्या दवाखान्याचा खर्च, कौटुंबिक खर्च याचीच ओढाताण असतांना ट्रॅक्टरच्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी महेंद्रा कोटक बॅंकेच्या सतत येणाऱ्या नोटीस, कापसाला कवडीमोल भाव असल्याने शेतीला लागलेला खर्चही हाती न आल्याने व दिवसेंदिवस कुटुंबाचा गाडा ओढणे मुश्किल झाल्यामुळे मयत रमेश निराशाजनक अवस्थेत जगत होता.

म्हातारे आई, वडील, पत्नी, मुलांना बिकट परिस्थितीत जगतांना पाहून मयत रमेश हतबल झाला होता व याच निराशेतून मयत रमेशने दिनांक ०३ मार्च ते ०४ मार्चच्या दरम्यान कोणतेतरी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी रमेशला तातडीने जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले मात्र नियतीला ते मान्य नसावे म्हणून की काय दिनांक ०७ मार्च २०२३ मंगळवार रोजी रमेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डांभुर्णी गावासह पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

(या घटनेची माहिती मिळताच पाचोरा तालुक्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांनी मयत रमेशच्या कुटुबियाची भेट घेऊन सांत्वन केले व शासनदरबारी काही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे.)
***************************************************
महेंद्रा कोटक बँकेने आमचा ट्रॅक्टर ओढून नेला नसता तर नक्कीच माझ्या मुलाने ट्रॅक्टरच्या भाड्यातून चार पैसे कमावले असते व यातुनच आमचा घरखर्च व कर्जाचे हप्ते भरले असते परंतु महेंद्रा कोटक बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी आमचे काहीही ऐकून घेतले नाही. कर्ज वसुलीसाठी सतत नोटीस पाठवून तगादा लावला यामुळे माझा मुलगा रमेश हताश झाला होता. अशी माहिती मयत रमेशचे वडील शांतीलाल परदेशी यांनी सत्यजित न्यूज कडे कथन केली.
***************************************************

ब्रेकिंग बातम्या