वेळीच लसीकरण व उपचारांमुळे अंबे वडगाव परिसरात लम्पी आटोक्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२२

मागील महिन्यात सगळीकडे लम्पी आजाराने थैमान घातले होते ‌ यात गाय, बैल, वासरांना मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. परंतु शासनाने त्वरित लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देत पशुधन विभागातील अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जास्तीत, जास्त गुरांना लसीकरण करुन लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून प्रयत्न केला आहे.

याच प्रयत्नातून पाचोरा तालुक्यात लम्पी आजावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, वरखेडी, हार्वे, जामने, कुऱ्हाड, वाणेगाव, लोहारी परिसरात मागील आठवड्यात झपाट्याने वाढणाऱ्या लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यात पाचोरा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे.

लम्पी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व समुळ नष्ट करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी हजर झालेल्या पाचोरा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. सुजाता सावंत यांनी सुत्रे हाती घेतली याच धावपळीत त्यांच्याकडे अजून विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तरीसुद्धा डगमगून न जाता त्यांनी पशुधन विकास अधिकारी नगरदेवळाचे डॉ. ए. आर महाजन, पिंपळगाव हरेश्र्वरचे डॉ. एन. आर. पाटील, वरखेडीचे डॉ. दिलीप शिंपी, बांबरुडचे डॉ. निलेश बारी तसेच डॉ. मडावी, डॉ. परदेशी, डॉ. टेम्पे, डॉ. गौतम वानखेडे सर्व पशुधन पर्यवेक्षक व डॉ. दिनेश राठोड खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांना सोबत घेऊन योग्य त्या मार्गदर्शक सूचना देऊन गावोगावी जाऊन लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून घेतले हे लसीकरण करतांना पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांनी फक्त गावातील नव्हे तर थेट शेत शिवारातील एक, एक गोधन शोधून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले याचेच फलित म्हणजे आज पाचोरा तालुक्यातील गावागावांतील लम्पी आजाराने बाधित गुराढोरांची संख्या उपचारादरम्यान कमी झाली असून गुरे दगावण्याची आकडेवारी नगण्य आहे. तसेच लम्पी आजाराची लागण थांबली असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे पाचोरा तालुक्यातील पशुधन पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरीही अजून काही दिवस गुराढोरांची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत अजूनही काही जनावरांना लसीकरण करुन घेतले नसेल तर ते त्वरित करुन घ्यावे, सद्यस्थितीत कुणीही गुराढोरांची खरेदी, विक्री व वाहतूक करु नये. ज्या गुरांना लम्पी आजाराची लक्षणे जाणवत असतील अश्या गुराढोरांना इतर गुराढोरांमध्ये मिसळु न देता वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी तसेच लगेचच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सुजाता सावंत यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या