दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव,निंभोरी लासुरे, लोहारी व मोंढाळे या शिवारांमध्ये दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी ४ वाजता ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आणि हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास या पावसाने हिरावून नेला पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणीला व काढणीला असलेल्या मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी यासारखी पिके पाण्यात पूर्णपणे सडली असून त्यांना कोंब देखील फुटण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच कापूस व ऊस पिकाची देखील मोठ्या प्रमाणात झाडे पडली असून झाडाला लागलेली कापसाची बोंड देखील मातीमोल झाली आहेत. झाडे देखील जमीनदोस्त झाली आहेत. यासोबतच ठिकठिकाणी विहिरी ढासळल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु इतके दिवस उलटूनही परिसरातील शेतकरी अजून देखील पंचनामा कधी होईल या प्रतीक्षेतच आहेत.


हे आस्मानी संकट ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात ओढवल्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल शिंदे यांनी थेट बांधा, बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची भेट घेतली व यावेळी पाहणी देखील केली. अशा कठीण व संकट काळात असणाऱ्या शेतकऱ्यांना धीर दिला व तेथून तालुक्याचे तहसीलदार कैलासजी चावडे साहेबांना फोन करून असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देऊन तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना लवकरांत, लवकर मदत मिळावी यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा ही विनंती केली. तसेच सदर विषय वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून लवकरांत, लवकर व जास्तीत, जास्त आर्थिक मदत कशी मिळवुन देता येईल यासाठी कटिबद्ध राहू असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.