कुरंगी गावच्या सोनटेक शिवारत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथुन जवळच असलेल्या कुरंगी गावच्या सोनटेक शेती शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतमजूरावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्याने जीवघेणा हल्ला चढवला परंतु हल्ला होताच शेतमजूराने जोरजोराने आवाज दिल्यावर आसपासच्या शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी आरोळ्या मारल्याने तसेच शेतमजूराने घाबरुन न जाता बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केल्यामुळे या हल्ल्यात शेतमजूर जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राजेश बापू लोहार वय वर्षे २६ हा मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत आहे. दररोज प्रमाणे आजही राजेश लोहार हा दोन मित्रांसोबत नगराज तारांचंद पाटील यांच्या शेतात रोजंदारीवर कामाला गेलेला होता. शेतात काम करत असतांनाच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमार राजेशवर बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवला हल्ला होताच राजेश याने बिबट्याला प्रतिकार करत जोरजोरात आरोळ्या मारल्याने जवळच असलेल्या मित्रांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यात बिबट्याने घाबरुन पळ काढला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात राजेश लोहार याच्या दोघ हातावर व शरिरावर जखमा झाल्या आहेत.
हि घटना माहीत पडताच उपसरपंच मा. श्री. शालीक पाटील व ग्रामपंचात सदस्य मा. श्री. अविनाश कोळी यांनी घटनास्थळी घाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करुन तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाचोरा येथील नगरपरिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेबाबत पाचोरा वनविभागाला कळवण्यात आल्यावर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. श्री. अमोल पंडित, वनपाल मा. श्री. पी. बी. देवरे, वनरक्षक मा. श्री. प्रकाश सुर्यवंशी व वाहनचालक मा. श्री. सचिन कुमावत यांनी पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात येऊन जखमी राजेश लोहार यांची भेट घेऊन विचारपूस केली व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली व घटनेचा पंचनामा करण्यासाठी सोनटेक शिवाराकडे रवाना झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याचे दर्शन ~
आज ज्या शिवारात बिबट्याने हल्ला चढवत राजेश लोहार याच्यावर जीवघेणा हल्ला केला याच शिवारात दोन दिवसांपूर्वी सरपणासाठी लाकडे जमा करणाऱ्या लोकांना बिबट्या दिसून आला होता. व आज याच बिबट्याने एका शेतमजूरावर जीवघेणा हल्ला चढवला असल्याने या शेतशिवारातील शेतकरी व शेतमजूर धास्तावले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.