बोगस डॉक्टर प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद, आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा. भाग (४)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२२
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटून दिवसाढवळ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. याबाबत सत्यजित न्यूज कडून दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन पाचोरा तालुक्याचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. श्री. समाधान वाघ यांनी संपूर्ण तालुकाभर भटकंती करुन गावागावात जाऊन त्यांच्या अखत्यारीत येणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर माध्यमातून बोगस डॉक्टरांची माहिती जाणून घेत त्यांना योग्य त्या लेखी सुचना देऊन यापुढे वैद्यकीय व्यवसाय करु नये असा समज दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतु एका बाजूला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात सुचना दिल्यावरही दुसरीकडे मात्र संबंधित बोगस डॉक्टर हे नियमितपणे आपल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करत असल्याने सुज्ञ नागरिक व जनमानसातून उलटसुलट चर्चा ऐकायला येत आहे. तसेच हे बोगस डॉक्टर काही मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या संपर्कात असून जे मान्यताप्राप्त डॉक्टर शहरात राहून खेड्यापाड्यात जाऊन आरोग्यसेवा पुरवतात त्यांच्याशी सलगी वाढवून मनधरणी करुन त्यांच्या नावाची दवाखान्याची पाटी लावून त्यांच्या नावाखाली आपला गोरखधंदा सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत असे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजकडे प्राप्त झाले आहे.
तसेच बोगस डॉक्टर व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जो खो, खो चा खेळ सुरु आहे. या खेळाबाबत जनतेतून उलटसुलट चर्चा सुरू झाली असून ठोस कारवाई होत नसल्याने आम्ही मारल्यासारखे करु, तुम्ही रडल्यासारखे करा असा बनाव (नाटक) तर करत नाहीत ना असा संशय व्यक्त केला जात असल्याने संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुक्यात आढळून आलेल्या बोगस डॉक्टराची नावे जाहीर करावीत म्हणजे जनमानसात बोगस डॉक्टर कोण याबद्दल माहिती होऊन सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य गरजू रुग्ण या बोगस डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणार नाहीत.
संशय~
सत्यजित न्यूज कडून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा भांडाफोड करण्यासाठीची मालिका सुरु झाल्यापासून संबंधित बोगस डॉक्टर काही हितशत्रूच्या मदतीने सत्यजित न्यूजवर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील असून या प्रयत्नातून एखाद्या वेळेस खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.