अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यावर ताणली बंदूक, सातगाव डोंगरी परिसरात खळबळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२२
जळगाव जिल्ह्यातील गावागावातून गावठी दारु निर्मिती व विक्री तसेच देशी दारुची अवैध विक्री, सट्टा, पत्ता, जुगारासह अमली पदार्थांची विक्री हे सर्व प्रकारचे अवैध धंदे भरवस्तीत, रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध धंदे करणारांना बऱ्याचशा ठिकाणी कथीत लोकांकडून राजाश्रय मिळत असल्याने ते कशाचीही भीती बाळगत नसल्याने गावागावांतील तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनपूर्ती करण्यासाठी चोऱ्या, लुटमार, गुंडागर्दी करत आहेत. तसेच या अवैध धंद्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवल्यास संबधितास दमदाटी करुन काही ठिकाणी मारठोक झाल्याच्या घटना घडत आहेत.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पुंडलिक आहिरे यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी तक्रार दिली होती. याचाच राग येऊन दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी तीन अज्ञातांनी तक्रारदार ज्ञानेश्वर आहिरे यांना सातगाव डोंगरी येथील बसस्थानकाजवळ असलेल्या पुलावरुन एकटेच जात असतांना तीन अज्ञातांनी एकांतात अडवून शिवीगाळ करून त्यांच्यावर बंदूक ताणली यावेळी ज्ञानेश्वर आहिरे व तीन अज्ञात व्यक्तींमध्ये झटापट सुरू झाल्याच्या आवाज ऐकून जवळच असलेले नागरिक पळत आले हे पाहून तीन अज्ञात इसमांनी मोटारसायकल घेऊन तेथुन पळ काढला व पुढील अनर्थ टळला अशी माहिती समोर येत आहे मात्र या घटनेमुळे सातगाव डोंगरी गावासह पिंपळगाव हरेश्र्वर परिसरातील जनता भयभीत झाली आहे.
या घटनेबाबत सातगाव डोंगरी येथील ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांच्या म्हणण्यानुसार मी गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंद्या विरोधात आवाज उठवत आलो आहे. आताही चार दिवसांपूर्वी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरात अवैध धंदे बंद व्हावेत. असे निवेदन सदर पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने, माझ्यावर दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मी गावातील बस स्टँड जवळील पुलावर एकटाच जात असतांना माझ्यावर तीन अज्ञातांनी शिवीगाळ करून बंदूक ताणली. आमच्यात झटापट होत असतांना झालेल्या आवाजाने जवळच असलेले नागरिक पळत आले. त्यामुळे सदर तिघेही इसम मोटरसायकल घेऊन पसार झाले. त्या रात्रीच मी संशयित तीन अज्ञात इसमांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस रितसर स्टेशनला गुन्हा दाखल केला असून चांगल्या कामासाठी मी आवाज उठवल्याने माझ्यावर झालेल्या अन्याय विरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी ज्ञानेश्वर अहिरे यांनी केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिघां संशयित अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेब व बीट हवलदार रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.