नवीन सरकारने दोन लाखावरील थकबाकीदार शेतक-यांची कर्जमुक्ती करावी – रमेशचंद्रजी बाफना यांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२२
नुकतेच राज्यामध्ये मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब व मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणविसांच सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर आम्ही शेतक-यांना आत्महत्या करण्यायासून प्रवृत करु असे जाहीर केले होते. याबद्दल महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो असे मत रमेशचंद्रजी बाफणा यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
बाफणा यांच्या मते शेतकरी आत्महत्या करण्याची साधारण दोन कारणे आहेत. एकाबाजूला शेतीमालाला मिळणारा कमी भाव व दुसरीकडे उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ, यामुळे शेतकऱ्याने घेतलेल कर्ज थकते व नंतर बँकांच्या, सहकारी संस्थांच्या व खासगी सावकारांच्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा सुरु होतो व यातुनच त्याचा स्वाभिमान दुखावला जातो तसेच कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा या विवंचनेत तो जगावे की मरावे या विचाराने निराश होऊन सरतेशेवटी आत्महत्येचा मार्ग निवडतो. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटूंबाची भयानक अवस्था होते. शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासन एक लाख अनुदान देते. व आपले कर्तव्य येथेच संपल अस समजलं जात.
परंतु कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून महाविकास आघाडी सरकारने या पुढच पाऊस उचलून कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली व नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊ केले म्हणून मी आघाडी सरकारचे अभिनंदन करतो असे रमेशचंद्रजी बाफणा यांनी मत व्यक्त केले.
परंतु आघाडी सरकारच्या पूर्वी महाराष्ट्रात सेना, भाजपच सरकार सत्तेवर असतांना मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोन लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी अगोदर दिड लाख रुपये कर्ज खात्यात भरल्यास उर्वरित रक्कम शासन भरेल अशी घोषणा केली होती. या करिता ३४००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त १९५०० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली व ज्या, ज्या शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीच्या आशेने कर्ज खात्यात दिड लाख रुपये भरले होते ते शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहीले व कित्येक कर्जबाजारी शेतकऱ्यांचा फार मोठा भ्रमनिरास झाला आहे.
म्हणून आता पुन्हा मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. म्हणून त्यांनी आता मुख्यमंत्री मा. श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मागील काळात त्यावेळी केलीली व अपूर्ण राहिलेले घोषणा पूर्ण करण्यासाठी १४५०० हजार कोटी रुपये उपलब्ध करून दोन लाखावरील कर्ज असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन आपण खरच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे सिद्ध करावे अशी नम्र विनंती पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील आदर्श शेतकरी रमेशचंद्रजी बाफणा यांनी पत्राद्वारे केली आहे.