पाचोरा तहसील कार्यालयासमोर हरीभाऊ पाटील यांचे आमरण उपोषण सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२२
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दिनांक १० मे २०२२ रोजी जन्मलेल्या नवजात बाळाला पावडरचे दुध पाजल्यामुळे मयत बाळाची प्रकृती खालावल्याने सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली तेव्हा योग्य पध्दतीने उपचार करत बाळाला शुध्दीवर आणण्यासाठी व श्वासनलिकेतील अडथळा दूर करण्यासाठी तसेच त्याच्या ह्रदयाचे स्पंदन (ठोके) वाढवून श्वासोच्छवास सुरळीत चालू व्हावा याकरिता योग्य पध्दतीने उपचार करणे गरजेचे असतांनाच निर्दयपणे बाळाच्या छातीवर सतत चापटी मारल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याचा सबळ पुरावा म्हणजे नवजात बालकाच्या छातीवर सतत चापटांचा मार दिल्यामुळे बाळाची छाती काळवंडलेली स्पष्टपणे दिसून येत आहे.
म्हणून चुकीच्या पध्दतीने उपचार करणाऱ्या बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी दिनांक १३ जुन २०२२ रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती. त्या अनुषंगाने संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण त्यावेळी तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते.
परंतु संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १० दिवसांच्या मागीतलेल्या कालावधीसाठी दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करत विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही. तसेच १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच हरीभाऊ पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांना १० दिवसाची म्हणजेच दिनांक ३ जुलै २०२२ पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली तरी सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही. आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही.
म्हणून आज दिनांक ४ जुलै २०२२ सोमवार पासुन बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांनी पाचोरा तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जो पर्यंत मयत बालकाचा शवविच्छेदन केलेला खरा अहवाल मिळून संबंधित बाळावर चुकीच्या पध्दतीने उपचार करणाऱ्या कर्मच्याऱ्यावर योग्य ती ठोस कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सरुच राहील असे हरीभाऊ पाटील यांनी सांगितले आहे.