वरखेडी गावात मागील तीन दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरुच, ग्रामस्थ व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२१
तालुक्यातील वरखेडी येथील भांड्याचे दुकान फोडून भांड्यांसह रोकड असा एकुण ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वरखेडी येथील भांडे व्यावसायिक जाफर ईमाम कहाकर (वय-४४) रा. वरखेडी ता. पाचोरा यांचे शहरातील सांगवी छोटू डॉक्टर यांच्या खळ्याजवळ भांड्याचे दुकान आहे. ३१ जुलै रोजी रात्री ९ ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भांड्याचे दुकान फोडून दुकानातील भांडे व ५० हजाराची रोकड असा एकुण ७४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.
याप्रकरणी जाफर कहाकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निताजी कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत असतांनाच आज परत दिनांक २ ऑगस्ट सोमवार रात्री ते ३ ऑगस्ट मंगळवार सकाळपर्यंतच्या वेळात वरखेडी येथील एका किराणा दुकानात चोरी झाली असून दुकानासमोर असलेल्या काही वस्तू व गोडेतेलाच्या तेलाच्या टाक्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
या चोरी प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निताजी कायटे यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी श्वाशपथकाला पाचारण केले होते परंतु श्वानपथक आल्यावरही काहीच हाती आले नसल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.
मात्र या सततच्या चोरी सत्रामुळे व्यापरीवर्गासह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने झालेल्या चोऱ्यांच्या तपासकामी तसेच चोऱ्यांचे सत्र थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याकरिता आज सायंकाळी पाच वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती निताजी कायटे ह्या वरखेडीचे पोलिस पाटील, सरपंच, व्यापारीवर्ग व ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.