सुटीचा दिवस पाहून पिंपळगाव हरेश्र्वर जवळील लाल घोडा धरणातून गौण खनिजाची चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर व इतर गावपातळीवरील धरण, पाझर तलाव, गायरान जमिन तसेच गावाजवळील ग्रामपंचायत हद्दीतील जमीनीवर काही जेसीबी व ट्रॅक्टर मालक अनाधिकृतपणे खोदकाम करुन या ठिकाणाहून माती व मुरमाचा उचल करुन काही लाखो रुपये कमाई करत आहेत तर या गैरप्रकारकडे स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल व तालुका स्तरावरून तहसीलदार साहेब व प्रांत साहेब यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम होऊन धरण, नद्या, पाझरतलाव, गावरान जमीन, ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक सपाट जागेवर तसेच रहदारीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ मोठे खड्डे तयार होत असल्याने भविष्यात या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे किंवा या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यावर या ठिकाणी अपघात होऊ शकतात कारण काही ठिकाणी थेट हमरस्त्यावर व महामार्गालगत खोदकाम करुन गौण खनिज उत्खनन व उचल सुरु आहे.
असाच काहीसा प्रकार काल दिनांक १२ जून रविवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर ते कौली रस्त्यालगत असलेल्या (लाल घोडा) धरण परिसरात दिवसभर सुरु होता. या लाल घोडा धरणातून काल एक जेसीबी व पाच ते सहा ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्या ठिकाणाहून कालच्या, काल शंभर ते दीडशे ट्रॉली मुरुमाची उचल करुन या मुरुमाचा पिंपळगाव हरेश्र्वर परिसरातील एका निसर्गरम्य हॉटेल जवळ मोठा ढीग मारुन ठेवण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. या उत्खनन व उचल केलेल्या मुरमाच्या मोबदल्यात जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालक यांनी कालच्या काल हजारो रुपये कमाई केली आहे तर दुसरीकडे शासनाचा हजारो रुपये महसूल बुडाला आहे.
जे
विशेष म्हणजे हे खोदकाम दिवसाढवळ्या धरण परिसरात व डांबरीकरण रस्त्याच्या अगदी जवळ करण्यात आले आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धरणातून मुरुम उचल केल्याने धरणाची खोली वाढून पाण्याची पातळी जरी वाढणार असली तरी या धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व उचल करतांना महसूल विभागची रितसर परवानगी घेणे गरजेचे होते तरीही परस्पर उत्खनन व गौण खनिज उचल केल्याने शासनाचा हजारो रुपये महसूल बुडाला आहे.
म्हणून आतातरी पिंपळगाव हरेश्र्वर सजेतील तलाठी व सर्कल यांनी लाल घोडा धरणातून उत्खनन करुन उचल केलेल्या मुरमाच्या डिगा याचा रीतसर पंचनामा करून महसूल वसूल केला पाहिजे अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
महत्वाचे~
पाचोरा तालुक्यात आजपर्यंत बऱ्याचशा खडी खदान व अवैध खोदकाम होऊन तयार झालेल्या खदानीत आजपर्यंत बरेचसे अपघात झाले आहेत व ही मालिका सुरूच आहे यात लहान मुले, पुरुष, महिलांना जीव गमावावा लागला आहे. तसेच काही ठिकाणी गुराढोरांचाही बळी गेला आहे म्हणून अशा अनाधिकृत उत्खननावर कडक कारवाई करावी व ज्या अधिकृत खदानी आहेत त्यांना नियमानुसार खदानीच्या चौफेर तार कंपाऊंड करण्यासाठी भाग पाडावे म्हणजे भविष्यात जिवीतहानी होणार नाही.