वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शेतातच वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गप्रेमी संतप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२२
पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून ही वृक्षतोड थांबवण्यासाठी निसर्गप्रेमी व सत्यजित न्यूज मागील दोन महिन्यांपासून प्रसारमाध्यमांद्वारे सतत वृक्षतोडीचे पुरावे सादर करत ही होणारी अवैध वृक्षतोड त्वरित थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागातील जबाबदार तलाठी, सर्कल, तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी साहेब हे या अवैध वृक्षतोडीकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत असल्याने आजही दिवसाढवळ्या महाकाय हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरु असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी करत नाराजी व्यक्त केली आहे.
या जबाबदार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीचा फायदा घेत वनविभागातील एका जबाबदार कर्मचाऱ्याने कायदा आपल्या बापाचाच समजून वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता स्वताच्या शेतातील हिरव्यागार महाकाय निंबाच्या व इतर वृक्षांची कत्तल सुरु केली आहे. ही वृक्षतोड पाहून काही निसर्गप्रेमींनी सत्यजित न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त करत ही होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी विनंती केली होती.
जे
याची दखल घेत सत्यजित न्यूज ने कुंपणच शेत खातय या शिर्षकाखाली बातमी दिली होती. ही बातमी समजल्यावर पाचोरा वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित वनविभागातील कर्मचारी कम शेतकऱ्याला त्वरित सुचना देऊन होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी सांगून काटाई झालेल्या वृक्षांचे जमिनीतील बुंधे पेटवून पुरावे नष्ट करण्यासाठी (केलेल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी) सांगून रितसर परवानगी घेऊन वृक्षतोड करावी असे सुचवले होते अशी चर्चा कोल्हे गावपरिसरातू सुरु आहे.
विशेष म्हणजे वृक्षलागवड, संवर्धनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्यांनीच सगळे नियम व कायदे धाब्यावर बसवून महाकाय हिरव्यागार वृक्षांची कत्तल करत असल्याचे पाहून कोल्हे गावपरिसरातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने संबंधित वनविभागातील कर्मचारी कम शेतकऱ्याने उर्वरित झाडे कापण्यासाठी आता परवानगी मिळवून घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच पावसाळा सुरु झाला असून अजूनही सोयगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्र्वर, शेंदुर्णी येथील लाकुड व्यापाऱ्यांनी पाचोरा व जामनेर तालुक्यात धुमाकूळ घातला असून हे लाकुड व्यापारी स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत आहेत. या वृक्षतोडीला पाचोरा व जामनेर तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याने अशा भ्रषाचारी कर्मचारी व अधिकारी यांचे भ्रमणध्वनीचे कॉल रेकॉर्ड काढले तर लाकुड व्यापारी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारनाम्याचे पितळ उघडे पडले यात शंका नाही.
निसर्गप्रेमींनी व्यक्त केल्या संतप्त भावना~
एकाबाजूला दररोज हजारो एकर शेत जमीनीचे बिगरशेतीत रुपांतर होत आहे. या एन.ऐ. झालेल्या शेत जमीनीवर सिमेंटची जंगले उभी रहात असून सोबतच कारखाने उभारले जात आहेत. या कारखान्यातून बाहेर निघणारा धुर, तसेच दररोज हजारो नवीन स्वयंचलित वाहने रस्त्यावर येत असून दळवळणात लाखो वाहणे मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड हवेत सोडतात या सगळ्यांचा विचार केला तर वृक्षतोड थांबवणे व नवीन वृक्षलागवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून शासनाने वृक्षतोड थांबवण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे असे सांगून भ्रषाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन कारवाईची मागणी केली आहे.