आपल्या वेदनेला ऊर्जेत रूपांतरित करा ‘ मृत्यू कार’ विनोद अहिरे
आयुष्य हे दुःख वेदनेचा समुद्र आहे. पण जो या ‘दुःख समुद्रातील’ लाटांना आपल्या सामर्थ्याच्या वीर बाहूंनी चिरत जाऊन सुखाचा किनारा गाठतो, तोच खरा माणूस. जगातील असा एकही व्यक्ती नाही, की त्याच्या जीवनात दुःख वेदना नसतील; परंतु बहुतांशी लोक आपल्या वेदनेचा ‘बाऊ’ करतात आणि म्हणत असतात की, माझ्या जीवनात इतक्या अडचणी,दुःख वेदना आहेत,की मी काहीच करू शकत नाही, असे कन्हत कन्हतच निसर्गाने दिलेला मानवप्राण्याला जन्म मानव फुकट घालून मरत असतो. आणि भूतकाळाच्या काळ्याकुट्ट अंधारात कायमचा गडत होत असतो. ना कर्तुत्वाची छाप! ना विचारांची प्रेरणा! मग असे असेल तर किडे, मुंग्या,जनावरं आणि माणसांमध्ये काय फरक आहे? तेही जन्माला आले तसे जगतात, आणि मारतात.
परंतु आमचे असे मत आहे की, आपल्या जीवनातील ‘दुःख वेदनेला’ ऊर्जेत रूपांतरित करायला आपण शिकले पाहिजे. दुःख वेदनेच्या काळामध्ये आपल्या शारीरात आणि मेंदूत जी शक्ती संचारते,ती अलौकिक अशी शक्ती असते; पण आपण कधी त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्नच करीत नाही.
दिव्य तेजा अंतरी आमच्या अंधाराची भीती न कुणा
आसमंत व्यापून निनादे
राष्ट्र गर्जना पुन्हा पुन्हा
म्हणजेच प्रत्येकामध्ये शक्ती असते, ऊर्जा असते,एक धगधगता अंगार असतो, फक्त गरज असते त्या अंगाराला फुंकर मारण्याची; पण.. आपण त्या धगधगत्या अंगाराला आपल्या कर्तृत्वाची फुंकर न मारता, उदासिनतेचे आणि नैराश्याचे पाणी शिंपडून विझवून टाकतो. आणि त्यामुळेच आत्महत्येसारखे भयानक विचार आपल्या मनात येत असतात.
संकटांचे सुद्धा दोन प्रकार असतात. एक नैसर्गिक संकटं आणि कृत्रिम संकटं दोन्ही संकट पेलण्याची आणि उलथवूनलावण्याची शक्ती आपल्यामध्ये असतेच;परंतु त्याचा पूर्ण ताकदीनिशी आपण संकटांचा प्रतिकार न करता, हतबल होऊन परिस्थितीसमोर गुडघे टेकून देतो.
एक शायर म्हणतो
शे सवार ही गिरते है मैदान-ए-जंग मे
वो तिफ्ल क्या गिरे
जो घुटनो के बल चले
म्हणजेच याचा अर्थ असा की, घोड्यावर पूर्ण ‘आयुधूनिशी’ स्वार होऊन युद्धभूमीवर शत्रुसंगे जो लढा देतो, आणि लढता लढता जखमी होतो, घायाळ होतो, जमिनीवर कोसळतो,आणि आपले प्राण सोडतो; परंतु त्याचे मरण हे काही साधेसुधे मरण नसते, तर ते वीरमरण असते. आणि त्या मरणाची इतिहास नोंद घेत असतो, आणि येणाऱ्या पिढीला त्यातून स्फूर्ती, प्रेरणा आणि त्यांचे वीर बाहू स्फुरण पावत असतात.
आणि यातील दुसरी अशी व्यक्ती असते कि, युद्धभूमीवर जाण्याअगोदर लहान मुलाप्रमाणे परिस्थितीसमोर गुडघे टेकून देत असते. म्हणजे घोड्यावर बसून युद्धभूमीवर जाऊन लढता लढता धारातीर्थी पडण्याचा प्रश्नच येत नाही.
आम्हाला तर असे वाटते की, असे लोक म्हणजे पृथ्वीवर एक प्रकारचा अतिरिक्त भारच आहे. जगतात आणि मरतातही आणि भूतकाळाच्या काळ्याकुट्ट गुहेमध्ये गायब होतात. ना त्याची कुणाला खबर असते, ना दखल असते.
” त्याकरिता जीवनाच्या युद्धभूमीवर सामर्थ्याच्या घोड्यावर बसून, कर्तृत्वाच्या तलवारीने, संकटांवर असे काही तुटून पडा की, इतिहासाने त्या संघर्षाची दखल घेतली पाहिजे. आणि येणाऱ्या पिढीला त्यातून स्फूर्ती प्रेरणा मिळाली पाहिजे.
कदाचित इतरांना नाही; परंतु आपल्या कुटुंबातील येणाऱ्या पिढ्यांना तर नक्कीच प्रेरणा मिळत असते. त्याकरिता “आपल्या जीवनात कितीही दुःख वेदना आल्या तरी; आपण न डगमगता त्या वेदनेला ऊर्जेत रूपांतरित केले पाहिजे.”
आमचे वयक्तिक असे मत आहे की, प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दडलेले आहे. आपल्यावर कितीही संकटे आली तरी या महापुरुषांना आपल्या मेंदूमध्ये, आपल्या रक्तामध्ये आपण त्यांना जिवंत ठेवले पाहिजे. मग ते तुमच्यामध्ये विद्रोहाच्या रूपाने असू शकतात. कविच्या रूपाने असू शकतात. योद्ध्याच्या रूपाने असू शकतात. साहित्यिकाच्या रूपाने असू शकतात.
कदाचित आमच्यामध्ये ते साहित्यिकाच्या रूपामध्ये दडलेली असतील, म्हणूनच आम्ही एप्रिल महिन्यात कोरोनाची प्रचंड भिती असतानासुद्धा कोरोणा कक्षात बसून “मृत्यू घराचा पहारा” हे पुस्तक लिहू शकलो. याचं कारण एकच आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समोर ठेवून आमच्या आतील वेदनेला आम्ही ऊर्जेत रूपांतरित केले,म्हणूनच हे शक्य झाले आहे.
त्याचबरोबर हितशत्रूंनी कटकारस्थान करून,निर्माण केलेल्या कृत्रिम संकटसमयी आम्ही तीन गोष्टीचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत असतो. एक म्हणजे आम्ही जो नियमित व्यायाम करत असतो, तो या संकटसमयी डबलचा करत असतो. दुसरे, आहारामध्ये सुद्धा नेहमीपेक्षा संकटसमयी अधिक प्रोटिन्स चा समावेश करतो. आणि तिसरे म्हणजे आम्ही जर महिनाभरात सात ते आठ पुस्तक नियमित वाचत असतो; तर संकटसमयी पंधरा ते वीस पुस्तके वाचण्याचा प्रयत्न आम्ही करतो. यामुळे आलेल्या संकटांशी लढण्याची आपोआपच प्रचंड ताकद आणि ऊर्जा मिळत असते ,आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनामध्ये निर्माण होत असते.
म्हणूनच आम्ही नेहमीच नैराश्यग्रस्त व्यक्तींना सांगत असतो की, “माणूस संकटांनी संपत नाही; तर त्यातून एका जिद्दीचा जन्म होत असतो.” म्हणूनच “जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला उद्धवस्त करण्यासाठी; येत नसतात तर आपल्या क्षमतांची परीक्षा घेण्यासाठी ते येत असतात.
त्याकरिता संकटांवर असं काही तुटून पडा, की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे.
पोलीस नाईक विनोद अहिरे
९८२३१३६३९९