वरखेडी बस स्थानक ते पी.जे. रेल्वे फटका पर्यंतचा डांबरीकरण रस्ता दाखवा बक्षीस मिळवा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०६/२०२१
रस्ते सुरक्षितता हा ,जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे बोधपर वाक्य लिहिलेल्या पाट्या रस्त्यावरून जातांना नजरेत पडतात. परंतु ज्यांनी जनजागृती करिता हे बोधपर सुचना फलक लावले आहेत ते त्यांनी तरी या वाक्यातील शब्दांचा अर्थ घेऊन त्याप्रमाणे रस्ते सुरक्षिततेसाठी काळजी घेतात का ? हा मोठा प्रश्न आहे.
कारण जळगाव जिल्ह्यातील बरचसे रस्ते पाहिल्यावर ज्यांच्या हातात रस्ते सुरक्षिततेसाठी जबाबदारी दिली आहे तेच कुंभकर्ण झोपेत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. या सार्वजनिक बांधकाम विभागाचे गलथान कारभारामुळे आजपर्यंत बरेच अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर निष्पाप जिवाचे बळी गेले असून दररोज अपघातांची मालिका सुरुच आहे. यात काहींना कायमचे अपंगत्व आल्याने ते जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत.तरीही लोकप्रतिनिधी व संबधित विभाग कुंभकर्ण झोपेत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अशीच परिस्थिती पाचोरा ते जामनेर या मुख्य रस्त्यावरील वरखेडी गाव परिसरात झाली आहे. वरखेडी हे बाजारपेठेचे गाव असून या वरखेडी गावाचे बसस्थानकापासून ते पूर्वेला जामनेर पाचोरा रेल्वे फाटका पर्यंत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत.
याबाबत वरखेडी व भोकरी ग्रामपंचायतीने वारंवार मागणी करून सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी विषयी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे वरखेडी बस स्थानक परिसर ते जामनेर, पाचोरा रेल्वे फाटक पर्यंतच्या रस्त्याचे बाजुला महाराष्ट्र बँक, दवाखाना, मेडिकल, कापड दुकान,किराणा दुकान व इतर व्यवसायाची दुकाने असल्याने या परिसरात ग्राहकांची तसेच इतर पायदळ चालणारांची व वाहनांची वर्दळ असते.
नेमके याच रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या रस्त्यावर डांबर आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. या प्रकारामुळे समोरा, समोर येणाऱ्या वाहनांमध्ये रस्त्याच्या खाली कोण उतरेल याच्या वरून वाद होत असतात. तसेच खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वार व मोठी वाहने यात कटबाजी होऊन दररोज भांडणे होतात. तसेच पायी चालणाऱ्यांसाठी साठी हा रस्ता अत्यंत धोकादायक असून या रस्त्याची त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी वरखेडी,
भोकरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
तसेच या रस्त्याची डागडुजी येत्या पंधरा दिवसात न झाल्यास या रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात लोकप्रतिनिधींची नावे लिहून त्याठिकाणी तसे बॅनर लावण्यात येणार आहेत. असेही संतप्त वाहनधारक व प्रवाशांनी सांगितले. तरी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगुन या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी अन्यथा या परिसरात होणाऱ्या अपघातास व जीवित हानीस लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशाराही सुज्ञ नागरिकांनी दिला आहे.