पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०६/२०२३
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था तथा पाचोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेच्या पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक २१ जून २०२३ बुधवार रोजी न्यायदंडाधिकारी मा. श्री. जी. बी. औंधकर साहेब, न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिरवाळे, न्यायाधीश मा. श्री. एम. व्ही श्रीखंडे साहेब व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब मा. श्री. संजयजी वाघ व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
****************************************
[न्यायदंडाधिकारी मा. श्री. जी. बी. औंधकर साहेब]
——————————————–
योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. लक्षात घ्या, योगासने दीर्घकाळ फायदे देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगासनाला जीवनाचा एक भाग करून घेणे गरजेचे आहे. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे. अशा वेळी योगासनेच तुम्हाला मदत करू शकतात. त्यासाठी आसने, प्राणायाम, दिर्घ श्वासोच्छ्वास आणि ध्यानधारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला उपयोगी पडतात. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याचा अंदाज आपल्याला येतो.आपली यंत्रणा ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांपासून बनलेली असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात, तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगासनांमुळे इतर अवयवांना व स्नायूंना बळकटी देण्यात येते. श्वासोच्छ्वासनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यानधारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून प्रत्येकाने दररोज योगासने केलीच पाहिजे असे मत पाचोरा नायालयाचे प्रथम न्यायदंडाधिकारी मा. श्री. जी. बी. औंधकर साहेब यांनी व्यक्त केले.
****************************************
(पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. संजयजी वाघ.)
——————————————–
दरवर्षी २१ जून रोजी देश आणि जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे. योगाचे हे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध ठिकाणी योग अभ्यास करण्यात येतो. तसेच योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात. योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी होत. यास अष्टांगयोग म्हणजे आठ अंगे असलेला योग आहेत असे म्हणतात अशी सखोल माहिती आपल्या मनोगतातून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब मा. श्री. संजय वाघ यांनी व्यक्त केली.
तसेच या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्यनमस्कार, त्यासोबतच शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती व दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला. प्राणायामानंतर प्रार्थनेने योगवर्गाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयात कार्यरत प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी योगशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली तर इतर प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी. सर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, पाचोरा विधी संघाचे सर्व पदाधिकारी, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. मंगेश गायकवाड, सचिव ॲड. राजेंद्र पाटील, ॲड. सुरेश माहेश्वरी, ॲड. एस. पी. पाटील, डी. आर. पाटील, बार कौन्सिलचे सदस्य वकील बंधू, भगिनी, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, दीपक पाटील, त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आर. बी. वळवी, पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, प्रा. डॉ. श्रावण तडवी, प्रा. स्वप्निल भोसले, शांताराम चौधरी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, ग्रंथालय विभाग तथा शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.