मजबुरीचा फायदा घेत लग्न लावून वरपक्षाला लुबाडण्याचा लागला छंद, मात्र पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी या चांडाळ चौकडीला केले जेरबंद.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील चेतन विलास चौधरी वय २७ या तरुणाचे वय वाढत चालले होते. म्हणून लग्न करण्यासाठी समाजातील मुलगी मिळवण्यासाठी समाजात सतत तीन वर्षांपासून शोधाशोध सुरू केली मात्र समाजातील मुलगी मिळत नसल्याने चेतनच्या कुटुंबियांनी दुसऱ्या समाजातील मिळेल ती चांगली मुलगी शोधून लग्न उरकून घेण्यासाठी सर्वानुमते ठरवरले व मग परक्या समाजातील मुलगी मिळवण्यासाठी शोधाशोध सुरू झाली
ही शोधाशोध करण्यासाठी कुणीतरी मध्यस्थी असल्यास काम सोपे होईल म्हणून त्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळसपुर येथील त्यांच्या मेव्हण्याच्या परिचयातील मध्यप्रदेशातील बडवानी येथील सुरेश (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्याशी बोलणी करुन देत मुलगी शोधून विवाह करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर मध्यस्थी एजंटने थोड्याच दिवसात मुलगी शोधली व देण्याघेण्याचा व्यवहार ठरवण्यात येऊन हा संबंध जोडून देणाऱ्या मध्यस्थी एजंट (दलाल) व त्याच्या साथीदारांनी चेतन चौधरी कडून १६००००/०० रुपयांची रोख रक्कम तसेच मुलीला लग्नाची साडी, चोळी, दागदागिने चेतन सोबत साध्या पध्दतीने लग्न लाऊन नववधूला चेतन चौधरी व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठवून दिले होते.
तदनंतर नवरी मुलगी आपल्या सासरी आल्यावर शांतपणे घरच्यांन सोबत मिसळून वागत पहिल्याच दिवशी मुलीचे वागणं पाहून चेतन व त्याचा परिवार आनंदीत होता. मात्र एजंटामार्फत लग्न लाऊन आणलेल्या नववधूच्या मानात मात्र वेगळेच षडयंत्र सुरु होते व ती घरातील किंमती वस्तू व रोख रक्कम शोधून लक्षात ठेवत होती. तर दुसरीकडे लग्न झाल्याचा व मुलगी शांत व सुस्वभावी मिळाली या आनंदाचे भरात चौधरी परिवार संध्याकाळी एकत्रितपणे जेवण करुन गप्पा करत मोठ्या आनंदाने व समाधानाने निद्रिस्त झाले होते.
घरात एजंटाच्या मार्फत आलेली नवी नवरी याच संधीची वाट पाहत होती. कारण ती चेतन सोबत विवाह करुन घरसंसार लाटण्यासाठी नव्हे तर घर लुटण्यासाठी आली होती. चेतन व त्याचा परिवार निचिंत होऊन झोपी जाऊ घरात आलेल्या नवीन सुनेबाबात झोपेतच स्वप्न रंगवत असतांनाच दुसरीकडे नववधूने रात्री दोन वाजेच्या सुमारास घरातील कपाटातून २५०००/०० हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचांदीचे दाग, दागिने घेऊन पसार झाली होती.
घेतला अपेक्षेप्रमाणे मुलगी मिळाली होती म्हणून चेतन भविष्यातील स्वप्न रंगवत बिनधास्तपणे झोपला होता. परंतु सकाळी, सकाळी चेतन सागर झोपेतून जागे झाला व उठल्याबरोबर आपण आपल्या अर्धांगिनीला सासवाडीत आल्यावर पहिल्या दिवशी पहाटे, पहाटे मनभरुन शुभेच्छा देऊ असे ठरवून तो नववधूला घरात शोधु लागला परंतु नववधू घरात किंवा घराच्या आसपास कुठेही आढळून आली नाही म्हणून चेतनने घरात व्यवस्थीत पाहिले तर काय घरातील कपाट सताड उघडे दिसून आले म्हणून त्याने आरडाओरडा करुन घरातील इतर सदस्यांना जागे करुन कपाटातील रोख रक्कम व दागिन्यांची शोधाशोध केली मात्र कपाटातील रोख रक्कम व दाग, दागिने मिळून न आल्यामुळे नवीन नवरीने आपल्याला फसवले ही बाब लक्षात येताच चेतन व त्यांच्या परिवाराने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला जाऊन आमची फसवणूक झाली असल्याची तक्रार दिनांक ०६ मे २०२२ शुक्रवार रोजी दाखल केली होती.
या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला भा.द.वी. कलम ४१७/४१९/४२०/३७९/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन या गुन्ह्याचा तपास पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये पोलीस नाईक रविंद्रसिंग पाटील (२५७२) यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या तपासकामी पोलीस नाईक रविद्रसिंग पाटील यांनी पोलीस कॉन्स्टेबल पंकज देविदास सोनावणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता गोविंदा चौधरी यांना सोबत घेऊन गावातील काही लोकांच्या मदतीने गोपनीय माहिती मिळवत एक पथक तयार करून त्या आधारे सापळा रचून खेड्यापाड्यात शोधाशोध करत, करत मिळालेल्या माहितीनुसार एकविस तासाचा प्रवास करत आठशे किलोमीटरवर जाऊन या खोट्या विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या सुरेश उर्फ मिश्रीलाल सुलभा आर्य वय ३८ राहाणार सोनवळ तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्यप्रदेश, अनिल विश्राम धास्त वय २० राहणार मोहमांडळी खरगोर. जिल्हा खरगोन मध्यप्रदेश, हाकसिंग उर्फ आपसिंग शिकाया पावरा वय ३८ राहणार हेन्द्रया पाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे, कलिता उर्फ लक्स्मी किसन किराडा वय १९ राहणार माहे मांडली खरगोन जिल्हा खरगोन मध्यप्रदेश येथुन चार आरोपींना अटक करुन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला आणले आहे.
आरोपींना अटक करुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला आणल्याची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर येथील फसवणूक झालेल्या चौधरी परिवाराने पोलीस स्टेशन गाठत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब, पोलीस नाईक रविंद्रसिंग पाटील व पोलीसांचे आभार मानले आहेत. तसेच पिंपळगाव हरेश्र्वर गावासह पंचक्रोशीतील गावातून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांचे कौतुक होत आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासकामी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री. प्रविणजी मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक मा. श्री. रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक मा. श्री. भरतजी काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले त्यानुसार या पथकाने कामगिरी केली आहे.