गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील रहिवासी हर्षल संजय तावडे वय वर्षे १७ हा माहिजी येथील गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याची पातळी जास्त असल्याने हर्षल यास पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येता येत नव्हते. तो पाण्यात बुडत असल्याचे याच नदी पात्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या नावाडी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आपली नाव हर्षल याच्या दिशेने वळवत इतर लोकांनाही हर्षलला वाचवण्यासाठी आरडाओरड करुन मदतीसाठी येण्याची विनंती केली.
परंतु नियतीला हे मान्य नसावे म्हणून नावडी व इतर पोहणारे लोक पटापट पाण्यात उडी टाकून हर्षलला वाचवण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहचत नाही तोच हर्षल पाण्यात बुडाला. पाण्यात बुडाल्यानंतर गिरणा नदीला भरपूर पाणी असल्याने हर्षलला शोधणे अवघड झाले. तरीही माहिजी येथील सारंग पवार, दिपक वराडे, तसेच कुरंगी येथील पंकज ठाकरे, नितीन कोळी यांनी खोल पाण्यात जाऊन हर्षलला बाहेर काढले परंतु तोपर्यंत उशिरा झाला होता. त्याला बाहेर काढल्यानंतर तो मृत झाल्याचे आढळून आले. लगेच अमोल पाटील यांनी अंबूलस मध्ये हर्षल याचा मृतदेह पाचोरा दवाखान्यात आणून सोडला. याठिकाणी बंन्सी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
हर्षल याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नांद्रा, माहिजी, कुरंगी या गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.