कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूकीसाठी ७४५ पैकी ६९८ मतदारांनी केले मतदान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीसाठी आज दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार रोजी शासकीय नियमानुसार सकाळपासून मतदानास सुरवात झाली. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांनी एकच गर्दी केल्याने सुरवातीला थोडी धांदल उडाली होती. परंतु नंतर निवडणूक अधिकारी त्यांचे सहकारी व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत परिस्थिती आटोक्यात आणली व पुन्हा शांततेत मतदानाला सुरुवात झाली होती.
दुपारनंतर मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत ७४५ सभासदांपैकी ६९८ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पात्र सभासदांपैकी काही सभासद बाहेरगावी असल्याकारणाने मतदान कमी झाल्याची माहिती समोर येत असून ६९८ मतदात्यांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. ९४ टक्के मतदान झाले आहे.
या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून कपबशी हे निवडणूक चिन्ह घेऊन भारतीय जनता पक्ष व सहकार परिवर्तन विकास पॅनलच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितपणे ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह घेऊन समोरासमोर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून कुऱ्हाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे निवडणुकीत भाजपा पुरस्कृत कपबशी या निशाणी वर शेतकरी सहकार विकास पॅनलला बहुमत मिळेल अशी चर्चा सोसायटीचे सभासद व ग्रामस्थांमधून ऐकायला मिळत आहे.