परधाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत घोळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील परधाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी यांनी आर्थिक प्रलोभनांना बळी पडून मनमानी करत निर्णय घेऊन निवडणूक प्रक्रियेतील सर्व नियमांची पायमल्ली कल्याचा आरोप संस्थेचे सभासद रामदास महाजन यांनी केला आहे.
रामदास महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार परधाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सभासदांनी आपापले उमेदवारी अर्ज ठरवून दिलेल्या नियम व अटी शर्ती प्रमाणे ठराविक वेळात दाखल केले होते. तदनंतर दिनांक ०९ मार्च २०२२ रोजी उमेदवारी अर्जाची छाननी अंतिम उमेदवार कायम करण्यात आले होते.
त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२२ पर्यंत समोरासमोर एकमेकांच्या विरोधात प्रत्येकी एक, एक उमेदवारी अर्ज ठेवून बाकीच्या उमेदवारांनी माघार घेत सरळसरळ लढत होणार असल्याचे निश्चिती नंतर मतदारांना माहिती व्हावी म्हणून निवडणूक नियमांनुसार दिनांक २५ मार्च २०२२ रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येऊन अधिकृत रित्या उमेदवारांचे नाव व चिन्ह याबाबतचे माहितीपत्रक कार्यालयाबाहेर प्रथमदर्शनी लावण्यात आले होते.
मात्र ही निवडणूक अटीतटीच्या उंबरठ्यावर असतांनाच निवडणुक प्रक्रीयेतील संबधीत अधिकारी यांनी आर्थीक व्यवहार करत लोभापायी दिनांक २८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान संस्थेच्या उमेदवारांना व सभासदांना अंधारात ठेवून मर्जीतील उमेदवारांचे सांगण्यावरून अनाधिकृतपणे, गैरमार्गाने माघारीची प्रक्रिया राबवून कुणालाही काही कळण्याच्या आतच तातडीने नियमबाह्य बिनविरोध उमेदवारांची यादी प्रसिध्द करत हि प्रक्रिया मागील तारखेला म्हणजे दिनांक २४ मार्च २०२२ रोजी राबविण्यात आल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घाट घातला आहे.
परंतु दुसरीकडे याच गडबडीत मतदाराच्या माहितीसाठी वेळोवेळी कार्यालयाच्या प्रथम दर्शनी लावण्यात आलेल्या सुचना व भित्तीपत्रक काढायचा विसर पडल्यामुळे हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर जागरूक सभासद रामदास महाजन यांनी अधिकृत लोकेशनसह फोटो काढून दिनांक, वेळ, व ठिकाण असलेले फोटो काढून पुराव्यानिशी या गैरप्रकाराबाबत सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व न्यायालयीन स्तरावर तक्रार करणेसाठी राबविण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया व निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माहितीची छायांकित प्रती मिळवण्यासाठी दिनांक ०१ एप्रील २०२२ रोजी निवडणुक निर्णय अधिकारी व संबधित विभागाकडे अर्ज दिला असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो अर्ज स्विकारुन पोचह देण्यास नकार दिला आहे.
म्हणून या निवडणुकी संदर्भात संपन्न झालेली प्रक्रीया ही नियमबाह्य व चुकीची तसेच सहकार निवडणुक आचारसंहितेचे उल्लंघन करून झालेली असल्याची तक्रार योग्य त्या पुराव्यासह रामदास महाजन यांनी पोलीस प्रशासनासह, सहकार खात्यातील संबधितांकडे रजिस्टर पोस्ट, व ई- मेल व्दारे तसेच वरीष्ठ पातळीवर केली असल्याचे सांगितले तसेच या निवडणुकीत काही सभासदांच्या सांगण्यावरून नियमबाहय प्रक्रिया राबवणाऱ्या व राबवण्यासाठी जबाबदार असलेल्या तसेच सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मच्याऱ्यांच्या विरोधात मे. उच्च न्यायालय व योग्य त्या स्तरावर विधीतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार दाखल करणार असल्याचे रामदास महाजन यांनी सांगितले आहे.