पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा दुरध्वनी मागील पंधरा दिवसापासून बंद. दूरसंचार विभाग कुंभकर्ण झोपेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२२
आज-काल सगळीकडे भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाल्यापासून दूरध्वनी संच अडगळीत पडले आहेत. परंतु अजूनही शासकीय कार्यालयांमध्ये दूरध्वनी क्रमांक महत्त्वाचे आहेत. कारण सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास शिवाय पर्याय नसतो. परंतु बी. एस. एन. एल. कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे महत्त्वाच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक एक, एक महिना बंद असल्याचा अनुभव लोकांना येत असून महत्वाच्या वेळी संबंधित कार्यालयात संपर्क होत नसल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अश्याच एक महत्त्वाच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक मागील पंधरा दिवसांपासून बंद आहे. हे कार्यालय म्हणजे २४ तास जनसेवेसाठी झटणाऱ्या विभागातील एक कार्यालय आहे. या कार्यालयाच्या भरवशावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असून तुम्ही, आम्ही व सर्वसामान्य माणूस यांच्याच भरवशावर बिनधास्तपणे, बिनदिक्कतपणे रहातो व फिरतो. असेच एक कार्यालय पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन असून या पोलिस स्टेशनवर जवळपास पन्नास खेड्यांची जबाबदारी आहे.
परंतु या पोलिस स्टेशनमध्ये असलेला दूरध्वनी हा मागील पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचा पोलिसांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या आयुष्यात कोणताही बरा, वाईट प्रसंग ओढवला म्हणजे संकटसमयी अगोदर आठवतो तो देव व नंतर आठवतो तो देवमाणूस म्हणजे पोलिस कारण संकटात बऱ्याचशा ठिकाणी आपले जवळचे लांब पळतात अश्या प्रसंगात सुध्दा थोडीही माहिती मिळाली म्हणजे रात्र, दिवस, उन, वारा व भरपावसात धावून येतो तो पोलिस.
म्हणून सद्यस्थितीत उन्हाळ्यात तसेच रहदारीच्या रस्त्यावर अपघात, चोऱ्या, दारुबंदी व इतर अशांतता परसवणाऱ्या घटना घडल्यानंतर सर्वसामान्य माणूस सरळ, सरळ पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. या मागील कारण म्हणजे सगळ्यांना संबंधित अधिकारी किंवा सहकारी कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक माहीत नसतो व जेव्हा कठीण प्रसंगात पोलिस स्टेशनला संपर्क होत नसेल तर सर्वसामान्य जनता हतबल होते व वेळीच मदत मिळाल्यास एखादी घटना मोठे रुप धारण करु शकते व जीवितहानी किंवा इतर संकट ओढवले जाऊ शकते म्हणून पोलिस स्टेशनला असलेला दुरध्वनी क्रमांक चोवीस तास सुरु असण अत्यंत गरजेचे आहे.
मात्र याचे भान व ज्ञान पाचोरा दूरसंचार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नसावे म्हणून की काय पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये असलेला दुरध्वनी क्रमांक मागील पंधरा दिवसापासून बंद असल्यावरही याकडे संबंधित विभाचे कर्मचारी व अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून कुंभकर्ण झोपेत असलेल्या दूरसंचार विभागाला जागे करण्यासाठी सरतेशेवटी प्रसारमाध्यमांना हातात लेखणी घ्यावी लागते ही खेदाची बाब आहे. आता हे वृत्त पाहिल्यावर तरी संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकारी याची दखल घेऊन पिंपळगाव पोलिस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक त्वरित दुरुस्त करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.