सातगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सातगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा ✒️ प्रतिनिधी ( दिलीप जैन. )
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरची नोंद झिरो क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील रहिवासी अशोक फत्रू तडवी (वय – ५३) यांचे नावे केवळ एक एकर जमिन असुन अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला. तसेच त्यांच्यावर बचत गटाचे कर्ज असल्याने कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत ते होते. सोमवारी सकाळी त्यांच्याकडे बचत गटाचे कर्जाचे हप्ते मागण्यासाठी काही अधिकारी येऊन गेल्याचे समजते. आता कर्ज आपल्याकडून फिटणार नाही. यामुळे ते हताश झालेले होते. शेतकरी अशोक तडवी यांनी दुपारच्या वेळेला घरात कोणी नसताना छताला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दर सोमवारी सातगावचा बाजार असल्याने मजुरीचे पैसे सोमवारीच मिळत असतात. त्यांची पत्नी दगडाबाई गावात मजुरी घेण्यासाठी गेलेल्या होत्या. त्या गावातून परत आल्या, तेव्हा आपला पती घराच्या छताला लटकलेले दिसले. त्यामुळे त्यांनी जोराने आरडाओरडा केला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन, पोलिस पाटील दत्तू पाटील, राजेंद्र बोरसे, जाकिर सोना तडवी, अशोक मानखाॅ तडवी आणि इतर काही लोकांनी त्यांना खाली उतरून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. पाचोरा पोलिस स्टेशनचे विकास पाटील यांनी पंचनामा करून झिरो क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. त्यांना दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.