परमेश्वराने दिल परंतु दुश्मनाने हिरावले, तारखेडा येथील मक्याच्या कणसाचा ढिगारा अज्ञाताने पेटवला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०५/२०२३
सद्यस्थितीत माणूस माणूस म्हणून जगतोय की नाही याबद्दल बरेचसे प्रश्न उपस्थित होत आहेत. माणूस आपल्या स्वार्थासाठी किंवा आपसातील वादविवाद, मतभेद याचा बदला घेण्यासाठी कोण कोणत्या स्तरावर जाईल याची शाश्वती राहिलेली नाही. यातुन दररोज मारामाऱ्या, ठोकाठोक्या, खुन अशी प्रकरणे घडतांना दिसून येत आहेत. म्हणतात ना कुत्र्याला गती व माणसाला प्रगती सहन होत नाही. असाच काहीसा वाईट प्रकार पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावी घडला आहे.
तारखेडा बुद्रुक येथील सौ. इंदुबाई अमृतराव पाटील यांची तारखेडा बुद्रुक शिवारात गट नंबर १८१/१/१/२ एकुण दोन एकर शेती जमीन आहे. या दोन एकर क्षेत्रात सौ. इंदूबाई यांनी परमेश्वर कंपनीचे मका बियाणे आणून उन्हाळी मका पेरला होता. मका लागवड केल्यापासून लागवड, फवारणी, निंदनी, कोळपणी करत जसा विद्युत पुरवठा उपलब्ध होईल तसा कधी रात्री तर कधी दिवसा भर उन्हात मक्याला पाणी देऊन मक्याची शेवटपर्यंत निगा राखली व मका परिपक्व झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मका पिकाची म्हणजे कणसांची खुडणी करुन मोठा ढिग (गंज) घातला होता. दोन, चार दिवस उन्हात ठेऊन मळणी यंत्र आणून मका काढण्याच्या तयारीत असतांनाच काल दिनांक २१ मे २०२३ रविवार रात्री ते २२ मे २०२३ सोमवार सकाळपर्यंतच्या कालावधीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मक्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्याची घटना सोमवारी सकाळी शेता शेजारील शेतकरी शेतात गेल्यावर उघडकीस आली आहे.
हि घटना माहीत पडताच सौ. इंदूबाई पाटील या धाय कोलमडून रडत, रडत शेताकडे धावत सुटल्या इंदूबाईंना पाहून गावकऱ्यांनी इंदूबाईंना सोबत घेत शेत गाठले शेतात आल्यावर मक्याच्या ढिगाऱ्याचे राखेत रुपांतर झाल्याचे पाहून इंदूबाईंची दातखीळ बसली व त्या क्षणात जमीनीवर कोसळल्या सोबत आलेल्या ग्रामस्थांनी विहिरीवरून पाणी आणत तोंडावर पाणी शिंपडून त्यांना शुध्दीवर आणले मात्र इंदूबाई उर भरून छाती पिटत धाय कोलमडून रडत होत्या.
कारण सौ. इंदूबाईंनी उधार, उसनवारीवर बी, बियाणे खाते आणून पेरणी पासून तर काढणी पर्यंत पैसा खर्ची घातला होता. विशेष म्हणजे पती व दोन मुलांनी मोलमजुरी करुन कमावलेला पैसाही खर्च करुन मका आल्यावर आपण सगळी कर्जफेड करुन थोडेफार पैसे शिल्लक राहतील व दोन घास सुखाचे खायला मिळतील पैसे आल्यावर नातवांना व सुना मुलांना नवीन कपडेलत्ते घेऊ काही धान्य घेऊ असे स्वप्न रंगवत असतांनाच कुण्यातरी हैवानाने रात्रीच्या वेळी मक्याच्या ढिगाऱ्याला आग लावून इंदूबाईंच्या स्वनांची राखरांगोळी केली. यात जवळपास साठ ते पासष्ट क्विंटल मका जळुन खाक झाल्याने अंदाजे एक लाख विस हजार रुपयांचा मका व मक्याचा चारा मिळुन इतके नुकसान झाले आहे.
सौ. इंदूबाईंच्या कुंटुबात पती, दोन मुले, दोन सुना नातवंडे असा परिवार आहे. थोडीफार शेतजमीन व मोलमजुरी हा जीवन जगण्यासाठी एकमेव आधार आहे. यातच कुण्या अज्ञाताने मक्याच्या ढिगाऱ्याला आग लावल्यामुळे आज सौ. इंदूबाईंच्या कुटुंबाल मोठा आर्थिक फटका बसला असून मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अश्या इंदूबाई सतत रट लाऊन रडत आहेत. म्हणून शासनदरबारी या घटनेची दखल घेऊन मक्याच्या ढिगाऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी व शासनाने सौ. इंदुबाई यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
परमेश्वर कंपनीचे मका बियाणे लागवड केल्यानंतर चांगले उत्पन्न पदरात पडले होते. परंतु कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मक्याच्या ढिगाऱ्याला आग लागली व क्षणातच राखरांगोळी झाली म्हणून परमेश्वराने दिले पण दुश्मनाने हिरावले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.