महाराष्ट्र बँक वरखेडी शाखा,व्यवस्थापकांनी कर्जा पोटी खाते बंद केल्याने उपचारासाठी अडथळा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथील दिव्यांग शेतकरी यांच्या खात्यावर आलेले दहा हजार रुपये पीक कर्ज वसुली करण्याच्या हेतूने कोणतीही पुर्व सुचना नदेता त्या दिव्यांग शेतकऱ्यांचे खाते बंद केले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याला उपचार करणे गरजेचे असून बँक खाते बंद केल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने वेळेवर उपचार घेता येत नसल्याने ते द्विधा मनस्थितीत फिरत आहेत. तसेच माझ्यावर उपचार करण्यासाठी महाराष्ट्र बँक मुळे अडथळा आला असून माझ्या जीविताचे काही कमी-जास्त झाल्यास महाराष्ट्र बँक व्यवस्थापकांना जबाबदार धरावे अशी मागणी लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आंबे वडगाव येथील दिव्यांग शेतकरी दिलीप फुलचंद जैन यांनी १ वर्षापूर्वी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतले आहे. अल्पशा पीककर्ज पोटी लाखो रुपयाच्या शेत जमिनीवर त्यांनी बोजा बसवला आहे. दोन वर्षाच्या सतत नापिकीमुळे व सतत उपचारासाठी लागणाऱ्या खर्चामुळे संबंधित शेतकरी बँकेचे कर्ज वेळेवर देऊ शकलेला नाही. परंतु आजही संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर बँकेने बोजा बसवला असून नियमाप्रमाणे व्याज सुरू आहे. तसेच स्वतःवर वेळीच उपचार करण्यासाठी तसेच बँकेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्या मालकीच्या जमिनीपैकी काही भाग दिलीप जैन यांनी नुकताच विकला असून त्याची खरेदी संबधीताला करुन देणे बाकी आहे.
म्हणून ज्यांना शेतजमीन विकलेली आहे. त्यांनी सौद्यापोटी ऑनलाइन दहा हजार रुपये खात्यावर दिले होते. परंतु ते पैसे बँकेत घेण्यासाठी गेले असता बँकेत खाते बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. म्हणून दिलीप जैन यांच्यावर उपचार करण्यात अडथळा येत असून भविष्यात उपचाराअभावी दिलीप जैन यांच्या जीविताचे काही कमी-जास्त झाल्यास महाराष्ट्र बँक जबाबदार राहील हे गृहीत धरून ते लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागणार आहेत.
कर्ज घेणे व त्याची इमानेइतबारे परतफेड करणे हे मला मान्य व क्रमप्राप्त असून मी कर्ज भरण्यास तयार आहे परंतु मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे तसे पीक हाती न आल्याने व सततच्या वैद्यकीय कारणामुळे कर्ज परतफेड करता आलेली नसल्याने व आता उपचारासाठी शेती विक्री करून उपचार करण्याच्या तयारीत असतांनाच महाराष्ट्र बँकेने खाते बंद केल्यामुळे उपचारात व्यत्यय आला असून माझ्यावर वेळीच उपचार न झाल्यास किंवा उपचाराअभावी माझ्या जीविताचे काही कमीजास्त झाल्यास महाराष्ट्र बँक व्यवस्थापक जबाबदार रहातील असे त्यांचे म्हणणे असून ते लवकरच मा.जिल्हाधिकारी व इतर ठिकाणी न्याय मागणार आहेत.