जंगली श्वापदाच्या हल्ल्यात शेळ्या ठार, पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा, जंगिपूरा, कुऱ्हाड, म्हसास, मालखेडा, लोहारा या गावांसह आसपासच्या गाव परिसरालगत राखीव जंगल असल्याकारणाने या गावातील शेती शिवारात रानडुक्कर, निलगाय (रोही), हरणांचा मुक्त संचार आहे. विशेष म्हणजे या राखीव जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी मराठवाडा व जळगाव जिल्ह्यातील बरेचसे शिकारी शिकार करण्यासाठी येत असल्याने वन्य प्राणी आपला बचाव करण्यासाठी मानव वस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
याच भटकंतीत आपले अन्न शोधण्यासाठी रानडुक्कर, हरण, तडस व बिबट्या हे जंगली प्राणी गाव वस्त्यांकडे धाव घेत असून रानडुक्करे व हरणी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तर तडस व बिबट्या हे मांसाहारी प्राणी शेतकऱ्यांच्या गाय, बैल, म्हस, शेळ्या या पशुधनावर हल्ला चढवून ठार मारत आहेत. ह्या सततच्या घटनांमुळे शेतकरी व शेत मजूर धास्तावले असून शेतात जाण्यायेण्यासाठी धजावत नसल्याने शेतीकामे खोळंबली आहेत.
मागील महिन्यात बिबट्याने लोहारा, कुऱ्हाड, मालखेडा या गावातील गोठ्यात घुसून तसेच खळ्यावर बांधलेल्या गाय, म्हैस, बैल, गोऱ्हावर हल्ला चढवून ठार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वरील गावातील शेत शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असून बऱ्याचशा शेतकऱ्यांना व शेतमजूरांना बिबट्या दिसून आल्यामुळे या बिबट्याला धरुन दुसरीकडे सोडण्यात यावे याकरिता पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार सांगूनही अद्यापही बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी वनविभागाचे गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून एखाद्यावेळेस जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.
तसेच दिनांक २५ डिसेंबर २०२२ रविवार रात्री ते २६ डिसेंबर २०२२ सोमवार सकाळपर्यंतच्या वेळात अंबे वडगाव येथील पी. सी. के. कॉटन जिनींग फॅक्टरी जवळ शेंदुर्णी ते अंबे वडगाव दरम्यान आण्णा सदाशिव गायकवाड यांच्या खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर जंगली श्वापदाने हल्ला चढवून पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाज सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात असून बिबट्या अंबे वडगाव गावाजवळ येऊन ठेपला असल्याने अंबे वडगाव येथील पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याकरिता वनविभागाने तत्परतेने लक्ष देऊन बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.