सावखेडा शिवारात चिंच फाट्यावर बेवारस ट्रॅक्टर व ट्रॉली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथून जवळच असलेल्या चिंच फाट्याजवळ एका शेतकऱ्याच्या शेताजवळ मागील दोन महिन्यापासून ट्रॅक्टर व ट्रॉली बेवारसपणे पडले असून हे ट्रॅक्टर व ट्रॉली कोणाच्या मालकीची असेल याबद्दल या परिसरातील शेतकरी संभ्रमात आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सावखेडा शिवारातील चिंच फाट्याजवळ मागील दोन महिन्यापासून स्वराज कंपनीचे ७४४ एफ.ई.या मॉडेलचे ट्रॅक्टर व ट्रॉली हे उभे आहे. सुरुवातीला काही दिवस हे ट्रॅक्टर खराब असल्यामुळे ते पडून असेल असा समज शेतकऱ्यांचा झाला होता. परंतु या घटनेला आज जवळपास दोन महिने उलटले तरीही सदर ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अद्याप कोणी आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच हे ट्रॅक्टर व ट्रॉली येथे सोडून गेल्यापासून काही दिवसांनी या ट्रॅक्टरच्या मशनरीचे काही महत्वाचे स्पेअर पार्ट काढून नेले असल्याचे निदर्शनात येत असल्याने कदाचित हे ट्रॅक्टर चोरीचे असावे असा संशय व्यक्त केला जात असून संबंधित ट्रॅक्टरचा तपास व्हावा व सत्य काय ते समोर आणावे असे या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.