पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पणची पिल्लावळ सक्रिय, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१०/२०२१
पावसाळा संपतो न संपतो तोच पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यातील लाकूड व्यापारी व त्यांचे दलाल सक्रिय झाले असून हे व्यापारी व दलाल गावागावात फिरुन शेतकऱ्यांना भेटून निंब, वड, उंबर, बेहडा, बाभूळ विशेष करुन थोड्याफार प्रमाणात असलेली आंब्याची हिरवीगार झाडे विकत घेऊन त्यांची विनापरवाना दिवसाढवळ्या कत्तल करुन वाहतूक करत आहेत.
एका बाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा अशी जनजागृती करत वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाणलोट, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्ची घालत असतांनाच दुसरीकडे हिरव्यागार वनराईची बेसुमार कत्तल केली जात आहे.
विशेष म्हणजे जंगलांचे रक्षण व्हावे, निसर्गसंपत्तीत वाढ होऊन ती जोपासली जावी म्हणून शासन आटोकाट प्रयत्न करत असतांनाच दुसरीकडे संबंधीत विभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी हप्ते घेऊन गडगंज संपत्ती कमावण्याच्या नादात स्वताचे चांगभले करुन घेत आहे. मात्र दुसरीकडे निसर्गसंपत्ती झपाट्याने नष्ट होत आहे.
सततच्या वृक्षतोडीमुळे तसेच दररोज हजारो एकर शेतजमीन बिगरशेतीत रुपांतरीत होऊन त्याच्यावर उभी राहणारी सिमेंटची जंगल, रस्ते, विविध उद्योग, रस्ते, मोठमोठे प्रकल्प तयार होत आहेत. हे जरी प्रगतीचे पुढचे पाऊल असलेतरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनस्पतींची जपणूक करणे काळजी गरज आहे. कारण एकाबाजूला झपाट्याने निसर्गसंपत्तीचा ऱ्हास व दुसरीकडे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या या तफावतीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर नक्कीच भविष्यात आपल्या हातात पश्चातापाशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही हे मात्र निश्चित आहे.
कारण निसर्गाचा कोप या ना त्या कारणाने सुरु झाला आहे. व याचे आपल्याला संकेत मिळत असल्यावरही आपण त्या बाबींकडे जाणूनबुजून म्हणा किंवा क्षणिक सुखासाठी म्हणा कमालीचे दुर्लक्ष करत आहोत.