जामनेर, पाचोरा रस्त्यावर अंबे वडगाव येथे रस्त्यावर खड्डा. अपघाताची मालिका सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१०/२०२१
जामनेर पाचोरा रस्त्यावर अंबे वडगाव बस स्थानक परिसरातील इंदिरानगर जवळ तसेच अनिल शिंदे यांच्या हॉटेल पासून काही अंतरावर मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यांमध्ये वाहनधारकांना आपली वाहने नेतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता जामनेर, पाचोरा रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाईप मोरी म्हणजे छोटा पुल होता. परंतु या परिसरातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून भराव केला आहे. विशेष म्हणजे हा भराव टाकतांना पाईप मोरीच्या तोंडापर्यंत भराव टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला आहे.
तसेच दक्षिणेकडील भागात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात बिगरशेती करून प्लॉट विक्री केली आहे. परंतु प्लॉट पाडून पैसा कमावण्याच्या नादात पाण्याचा प्रवाह वाहून नेणारी छोटी नाली अर्थात (खोंगळी) माती व मुरूम टाकून बुजवून टाकत पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने हे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
या कारणांमुळे जामनेर, पाचोरा रस्त्यावर असलेली ब्रिटिश कालीन पाईप मोरी बुजवली गेल्याने कुऱ्हाड रस्त्याकडील शेती शिवारातील पावसाचे पाणी व गावातील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने हे पाणी रहदारीच्या मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून मोठा खड्डा पडलेला आहे.
हा खड्डा पडल्या पासून आजपर्यंत बरेचसे अपघात झाले असून दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे. याबाबत पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवले असता हा खड्डा दुरुस्तीसाठी कोणत्याही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याने पंचक्रोशीतील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
म्हणून आतातरी पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीत टाकलेला भराव काढून वर्षानुवर्षापासुन असलेली जुनी मोरी (छोटा) पुलाचे पाईप मोकळे करुन वाहून येणाऱ्या पाण्यासाठी वाट मोकळी करत रस्त्यावर पडलेला खड्डा त्वरित भरून काढावा अशी मागणी जोर धरत आहे.