विद्यूत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने विद्युत बिलाचे पैसे परस्पर हडप केल्याची चर्चा. विद्युत ग्राहक द्विधा मनस्थितीत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचे वेगवेगळे किस्से ऐकावयास येत असून एका बाजूला विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी बिल वसुलीसाठी अधिकृत वीज ग्राहकांना वेठीस धरत असून बिल न भरल्यास विद्युतपुरवठा खंडित करत आहेत. तर दुसरीकडे सर्वदूर विद्युत वाहिन्या वर आकोडे टाकून वीज चोरी करणाऱ्या विद्युत चोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र या विद्युत चोरीकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा ऐकावयास मीळते. तसेच आंबे वडगाव येथे लाईनमन व विद्युत सहाय्यक व मदतनीस यांची नियुक्ती असून हे मुख्यालयात राहत नसल्याने विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका विद्युत कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून विद्युत बिलाची रक्कम घेऊन ती परस्पर हडप केल्याचा प्रकार झालेला असून विद्युत ग्राहकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा या प्रकाराकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने विद्युत ग्राहकांना नाहक मनस्ताप व आर्थिक भुदंड सोसावा लागत असून (धरलं तर चावतंय सोडल तर पळतय) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गैरप्रकाराबाबत विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता, प्रत्येक विद्युत ग्राहकाने आपले बिल स्वतः भरावयाचे असते असे सांगत संबंधित कर्मचाऱ्याने बिलापोटी वसूल केलेल्या रकमेचे आम्ही जबाबदार नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे अधिकृत कर्मचारी असल्याने आम्ही त्याच्या जवळ वीज बिलाचा भरणा केला असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तरी अशा घोटाळेबाज कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन वीज ग्राहकांचे पैसे त्वरित मिळावे अशी जोरदार मागणी केली जात असून त्रस्त विद्युत ग्राहक आंदोलन छेडण्याचा तयारीत आहे असे समजते.