काळ आला होता पण, वेळ आली नव्हती, लासुरे येथील शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश, मात्र बैलाचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लासुरे येथील शेतकरी अतुल अर्जुन देवरे वय ३२ हा त्यांचा चुलतभाऊ कपील शिवाजी देवरे (पाटील) यांच्या मालकीची बैलगाडी घेऊन शेतात जात असतांना शेत रस्त्यावर असलेल्या नदीत नियमित प्रमाणे बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असता बैलगाडी सह पाण्यात ओढला गेला मात्र जवळच असलेल्या दोन तरुणांनी लगेचच पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नात अतुल दवरे व एक बैलाचा जीव वाचवण्यात यश आले मात्र एक बैल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लासुरे येथील अतुल अर्जुन देवरे हा नेहमीप्रमाणे शेतात बैलगाडी घेऊन जात असतांना गावाबाहेरील नदीवर नियमितपणे ठरलेल्या ठिकाणी पाणी पाण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आल्याने खड्डा पडला असल्याने व तो खड्डा ज्ञात नसल्याने बैलांनी पाण्यात पाय टाकताच खड्डा खोल असल्याने त्यांचा त्या खड्ड्यात तोल जाऊन ते बैलगाडी सह पाण्यात ओढले गेले.
आपण पाण्यात बुडत आहोत हे लक्षात येताच अतुल देवरे यांनी दोघ बैलासह पाण्याबाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. बैल व अतुल पाटील हे बुडत असल्याचे पाहून जवळच असलेले लासुरे येथील मस्तानचा चॉंदखा तडवी व वरखेडी येथील सागर कोळी यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन एकाने आतून देवरे यांना पाण्यातून बाहेर काढले व एकाने बैल वाचविण्यासाठी धडपड सुरू केली यात यांना एक बैल वाचवण्यात यश आले असून दुसरा बैल खोल पाण्यात गेल्यामुळे तो मृत झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची लासुरे येथील पोलीस पाटील संजय धोंडू पाटील यांनी तलाठी यांना कळवताच निंभोरी सजेच्या तलाठी मॅडम रुपाली रायगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटना जाणून घेत पंचनामा केला. तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन बैलाचे शवविच्छेदन केले यात संबंधित शेतकऱ्याचा ४००००/०० हजार रुपये किमतीचा बैल मृत झाल्याने आधीच अतिवृष्टीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यावर पुन्हा संकट कोसळल्याने गावातून हळहळ व्यक्त केले जात आहे.
मस्तान तडवी व सागर कोळी घटनास्थळी असल्याकारणाने ते देव रुपाने धावत आले व माझा जीव वाचला व पुढील अनर्थ टळला अन्यथा त्या प्रसंगाची आठवण न करणेच बरे असे अतुल देवरे यांनी सांगितले.