कळमसरा ते कुऱ्हाड दरम्यान सोनद नदीवरील पुल वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे हाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील शहापूर, कळमसरा ते कुऱ्हाड अंदाजे १३ किलोमीटर लांबीचा रस्ता मागीलवर्षी बनविण्यात आला होता. यात कळमसरा गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या सोनद नदीवर पूल बांधण्यात आला आहे. परंतु हा पुल मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने व सोनद नदीला मोठा पुर आल्यामुळे हा पुल वाहून गेल्याने सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून बांधकाम विभागाच्या गलथान कारभारा बाबत संताप व्यक्त केला जात असून या बांधकामाची चौकशी होऊन संबधित ठेकेदार, इंजिनिअर व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
शहापूर, कळमसरा ते कुऱ्हाड या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे आठ कोटी रुपयांच्या जवळपास निधी मंजूर झाला असून यात एकुण लांबी १३.१७ असून पैकी ११.८९५ किलोमीटर डांबरीकरण, ०.८८५ काँक्रिटीकरण तसेच ४० मोरया व एक पूल बांधण्याचे इस्टिमेट होते.
परंतु या रस्त्याचे काम करतांना शासनाने ठरवून दिलेल्या बजेटमध्ये व अटी, नियमानुसार काम झालेले नसून या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कुऱ्हाड, कळमसरा, शहापूर येथील नागरिकांनी केला आहे.
या कामातील भ्रष्टाचाराचा मोठा पुरावा म्हणजे काही महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला पुल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे जिवंत उदाहरण जनतेसमोर आहे. म्हणून पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन संबधीतावर कडक कारवाई करुन तो पूल त्वरित बांधण्यात यावा जेणेकरून शहापूर, कळमसरा, कुऱ्हाड या गावातील शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत अशी मागणी वरिल गावातील रहिवासी व शेतकऱ्यांनी केली आहे.