माकडाला वाचवण्यासाठी अतिश चांगरेंची धडपड, वनविभाग व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चालढकल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२१
पाचोरा येथील नगरपालिकेच्या सी.ओ. मॅडम यांचे घराजवळील एका घरात एक माकडीन आढळून आली असून तिला प्रसव वेदना होत आहेत. परंतु ती अशक्त असल्याने तिला औषधोपचाराची गरज असून त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.
ही माहिती मिळताच पाचोरा येथील प्राणीमित्र अतिश चांगरे यांनी माकडाजवळ जाऊन पाहणी केली व तिला वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी वनविभागाला कळविले मात्र वनविभागाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे अडचण येत आहे. तसेच पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला परंतु वनविभागाने सहकार्य केल्याशिवाय माकडावर उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितले. कारण माकडावर उपचार करतांना ते माकड चावा घेऊ शकते किंवा इतर माकडे हल्ला चढवू शकतात अशी भिती व्यक्त केली. माकडावर उपचारासाठी वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळत नसल्याने माकडाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी याबाबत प्राणिमित्र व लोकप्रतिनिधी यांनी वनविभाग व पशुधन विकास अधिकारी यांना सूचना देऊन त्वरित त्या माकडावर उपचार करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व वन्यप्राणी प्रेमींनी केली आहे.