काळ आला होता पण वेळ आली नव्हती, विषारी साप चाललेल्या तरुणास डॉ. स्वप्नील पाटील यांनी दिले जीवदान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील वाडी येथील सोहेल शेख या तरुणास दिनांक २३ जूलै २०२२ रोजी गाढ झोपेत अती विषारी मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सोहेल यास गंभीर अवस्थेत पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर डॉ. स्वप्नील दादा पाटील यांनी सोहेल याची तपासणी करुन कुटुंबीयांनी सांगितलेला घटनाक्रम लक्षात घेऊन बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सोहेल वर तातडीने उपचार सुरु केले.
परिस्थिती अत्यंत गंभीर होती व सोहेल यास श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्रास होत होता म्हणून डॉ. स्वप्नील दादा पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता दवाखान्यातील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत लगेचच व्हेंटिलेटर लावून त्यास कृत्रिम श्वासोच्छवास देऊन सर्पदंशाचे उपचार सुरु केले. या उपचारादरम्यान सोहेल याची ह्रदयाची गती दोन वेळा बंद पडली होती. म्हणून त्यास सी.पी.आर. (CPR) देत अनुभवाच्या आधारे व आत्मविश्वासाने सतत पाच दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या सोहेल यांच्यावर चांगले औषधोपचार करुन त्याला मृत्युच्या दाढेतून परत आणले. म्हणून एकाबाजूला यमदूत उभा असतांनाच दुसरीकडे देवदूत बनून डॉ. स्वप्नील दादा पाटील खंबीरपणे उभे ठाकले व त्यांनी यमदूताला परतवून लावले ही घटना पाहता काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
दोन दिवस अगोदरच सोहेल शेख याची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांची दवाखान्यातून सुट्टी करण्यात आली. सोहेल शेख यास मण्यार जातीच्या अती बिषारी सापाने दंश केल्यावर सुध्दा डॉ. स्वप्नील पाटील व त्यांच्या दवाखान्यातील सहकाऱ्यांनी सतत पाच दिवस डोळ्यात तेल घालून चोवीस तास देखरेख करत त्याला जीवदान दिले याबद्दल वाडी येथील ग्रामस्थांनी व सोहेल शेखच्या कुटुंबीयांनी डॉ. स्वप्नील दादा पाटील, बालरोगतज्ज्ञ ग्रीष्मा पाटील व दवाखान्यातील सहकाऱ्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व धन्यवाद दिले.
याप्रसंगी बनोटी येथील डॉ. अजित पाटील व रहीम बागवान यांची उपस्थिती होती.