अंबे वडगाव गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला, डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२३
हिवाळा सुरू होताच पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गाव परिसरात डासांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या गावात त्वरित धूर फवारणी करावी, अशी मागणी अंबे वडगाव गावातील नागरिकांनी केली आहे.
हिवाळा हा डासांचा प्रजननाचा काळ असतो. या कालावधीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. अंबे वडगाव गावात मलेरिया, डेंगू सारख्या आजाराची लक्षणे जाणवत असून डासांचे त्वरित निर्मूलन न केल्यास भविष्यात मलेरिया व डेंग्यू सारख्या आजाराची लागण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अंबे वडगाव गावात सर्व शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील लोक रहात असल्याने दिवसभर काम करुन थकून, भागून आलेल्या शेतकरी व शेतमजूरांना डासांच्या उपद्रवामुळे आरामाची झोप घेणे मुश्कील झाले आहे.
असे असले तरी मागील पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने काही भागात सांडपाण्याच्या गटारींची साफसफाई केली मात्र इतर भागातील गटारींची साफसफाई केली गेली नसल्याने इतर भागात डासांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच आजपर्यंत आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला कोणत्याही सुचना देण्यात आल्या नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून गावातील डासांच्या निर्मूलनासाठी त्वरित धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.