पाचोर्यात एकाच जागेवर दोन पुरवठा निरीक्षण अधिकारी; प्रशासनाचा सावळा गोंधळ की आर्थिक लागेबांधे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०५/२०२१
महाराष्ट्र राज्यात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने महसूल कार्यालयाअंतर्गत पुरवठा शाखेत पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.मोठे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्यात एक पुरवठा निरीक्षण अधिकारी असे याचे सर्वसाधारण स्वरूप असले व जिल्ह्यातील इतर तालुक्यात पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा असतांना पाचोऱ्यात मात्र पुरवठा निरीक्षण अधिकारी या एकाच पदावर दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका हा अनेक महसूल विषयक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतो.वाळूचोरी विरोधातील संशयास्पद कारवाया असोत की लाचखोरीची कारवाई असो वा तत्सम पुरवठा विभागातील दलालखोरीशी असलेली हातमिळवणी असो या ना अनेक चर्चामुळे जनमानसात पाचोरा तहसील प्रशासन कायम संशयाच्या भोवऱ्यात असते. त्यातच आता एकाच जागेवर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे नेमके गौडबंगाल काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सप्टेंबर २०१९ मध्ये पाचोरा पुरवठा शाखेत पूनम थोरात नामक महिला अधिकाऱ्याची पुरवठा निरीक्षण अधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची कोणतीही मागणी नसतांना प्रशासनाने त्यांची सेवा जळगाव पुरवठा शाखेत वर्ग करून त्यांचे जागेवर जळगाव पुरवठा शाखेत मूळ नियुक्तीवर असलेल्या श्रीमती दीपाली ब्राह्मणकर यांची प्रतिनियुक्ती पाचोरा पुरवठा शाखेत केली.तर आता पुन्हा पूनम थोरात यांना त्याच्या मूळ पदावर पदस्थापना केल्यानंतर श्रीमती दिपाली ब्राम्हणकर यांना देखील त्यांच्या मूळ जळगाव येथे त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी बदली करणे अपेक्षित असतांना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांनी आदेश काढत दोन्ही नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच पदावर काम करण्याचे उरफाटे आदेश दिले आहेत.
नेमके एकाच जागेवर दोन महिला अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्याचे कारण काय याविषयी उलट-सुलट चर्चा होत आहे. तर यामागे काही आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना अशी शंका व्यक्त होत आहे.
पुढची सडेतोड व रोखठोक बातमी
(पाचोरा तालुक्यातील रेशनिंगचा महा घोटाळा, अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण काना डोळा.)