जे घरात आहेत ते म्हणतात रस्यवर उतरु, परंतु जे जन्मजात रस्त्यावर आहेत त्या गरिबांनी गाऱ्हाणे मांडावे तरी कुणाकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
सर्वदूर कोरनासारख्या आजाराने थैमान घातले असून शासन-प्रशासन जनहितासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांनाच मागील एक वर्षापासून सतत कोरोनाच्या सावटाखाली जीवन जगतांना सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे मुश्कील झाले असून शासनाकडून वेळोवेळी मिळालेल्या आर्थिक मदतीवर अन्नधान्यावर व आश्वासनाच्या खैराती वर जीवन जगतांना आता जीवन जगणे मुश्किल झाले असून कोरोनाचे संकट अद्यापही हटत नसल्याने जनतेच्या सहनशक्तीचा अंत होत आहे.
तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी पक्ष नेते (तुझे माझे जमेना खुर्ची वाचून करमेना) या उक्तीप्रमाणे ज्यांना जनहिताचा विचार न करता एकमेकांच्या विरोधात कटकारस्थान करत कधी सत्ता पाडण्यासाठी तर कधी राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी कटकारस्थान करत आहेत.
अश्या या कठीण परिस्थितीत पुन्हा निवडणूक घेण्याची स्वप्न रंगवली जात आहेत. परंतु या महामारीच्या काळात खरच (जनतेविषयी कळवळा असेल तर सत्तेची गरज नसते असे म्हणतात) त्याप्रमाणे जनहितासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कोरोनासारख्या मारीचा सामना करण्यासाठी व जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी एकत्र आल्यास नक्कीच आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर निघू याबद्दल शंका नाही.
सद्यस्थितीत प्रत्येक जण आपल्याजवळ असलेल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगत आहे. काहिंनी खाजगीत व्याजाने पैसे कढले आहेत. काहिंनी घरातील डागडागीणे विकून विशेष म्हणजे कठीण प्रसंग असल्याने घरातील लक्ष्मीच्या गळ्यातील सौभाग्याच लेण असलेले मंगळसूत्र विकून घरातील चिल्यापिल्यांना दोन घास खाऊ घालत आहे.
ज्याच्याजवळ शेती आहे त्यांनी आपली शेतजमीन आत्तापासूनच भाडेतत्त्वावर देऊन उचल घेऊन मरणाला रात्र आडवी करत असून घरासमोर बांधलेली जिवापाडजपलेली म्हैस, गाय, बैलजोडी मातीमोल भावात विकून वेळ काढत आहेत.
तसेच खाजगी सावकारी कागदोपत्री बंद असलीतरी आजतरी त्याशिवाय पर्याय नसल्याने चोरीचोरी चुपके चुपके गावातील पंचमंडळीच्या साक्षीने व्यवहार होत आहेत.
परंतु आजही जमीनीवर झोपून आकाश पांघरणारा एकवर्ग या संकटकाळात भरडला जात आहे. यांच्या जवळ ना शिधापत्रिका ना रहायला निवारा मग पोट भरण्यासाठी गावोगावी जाऊन मिळेल तो व्यवसाय करणे किंवा भिक्षुकी करुन पोट भरणे असे जीवन जगत असतांनाच आठवडे बाजार, सण, उत्सव, मंदिर, यात्रा उत्सव बंद झाल्यामुळे या ठिकाणी किंवा यात्रेत खेळणी, फुगे, लाटणे, पोळपाट, केरसुणी व ईतर संसारपयोगी वस्तू तसेच रहाट पाळणे, मोत का कुवा, डोंबारीचा खेळ दाखवणारे यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून यांची कुठेही नोंद नसल्याने त्यांना शासकीय सोईसुविधा मिळत नसल्याने जगावे की मरावे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला असून यांनी मदत तरी कुणाकडे व कश्याच्या आधारावर मागावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.