कोरोना नावाचा बागुलबुवा अन गल्लीबोळात बोगस डॉक्टरांची हवा. रुग्णांच्या जिवशी खेळ.

-
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२१
महाराष्ट्रासह जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असून याच्या पासून बचाव करण्यासाठी शासन, प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करत आहे. तरीही आमच्या सर्वांच्या हलगर्जीपणा कारणीभूत ठरत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोना या व्याधीच्या बाबतीत उपचारासह पथ्य पाळल्यास या आजारातून लवकरात लवकर बरे होता येते.
परंतु दुसरीकडे कोरोना या आजाराचे बाबतीत (अंधा बोले क्या होता, बहिरा बोले ब्याह होता) म्हणजे वाजंत्रीचा आवाज ऐकून आंधळा बहिऱ्याला विचारतो काय होत आहे. तेव्हा बहिरा सांगतो की लग्न होतय. अश्याच पध्दतीने कोरोना आजाराविषयी जनमानसात समज, गैरसमज पसरवले जात असून सर्दी, पडसे झाले किंवा खोकला आला म्हणजे तुम्हाला कोरोना झाला असे समजले जाते तसा भ्रम होतो किंवा (गैरसमज) निर्माण केला जातो.
मात्र आजच्या परिस्थितीत सर्दी, पडसे, खोकला, घसा खवखवणे, अन्नाची चव न लागणे व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधने अत्यंत गरजेचे आहे.
परंतु सर्दी, पडसे झाल्यावर शहरातील मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला लगेचच कॉरंटाईन करुन घेतील मग आपल्याला घरापासून, नातलगापासून दुर रहावे लागेल, मग खुपच हाल होतील अशी भिती सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. किंवा तसे वातावरण तयार करणारा एक गट सक्रिय असल्याचे दिसून येते.
नेमका याचाच फायदा घेत ग्रामीण भागातून वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेही शिक्षण न घेतलेले व वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे कोणतेही मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले परंतु पैश्याच्या जोरावर वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेही शिक्षण व प्रशिक्षण न घेता बाहेर राज्यातील परंतु महाराष्ट्रात मान्यता नसलेले वैद्यकीय व्यवसायाचे रजिस्ट्रेशन (प्रमाणपत्र) मिळवून ज्यांना ॲलोपॅथी औषधांची सविस्तर माहिती व अभ्यास नसतांना तसेच त्या औषधातील असणारे घटक कोणते त्या घटकांचे शरीरावर होणारे परिणाम, दुष्परिणाम, तसेच आजाराची लक्षणे कोणती, काय आहेत, रुग्णाच्या वयानुसार व सहनशक्तीनुसार औषधाची मात्र किती द्यायची याचा कोणताही ताळमेळ लक्षात न घेता बिनबोभाट वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर गावागावात फिरुन रुग्णांच्या जिवाशी खेळत असतांना दिसून येत आहेत. या कारणांमुळे दिवसाढवळ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ खळला जात असून आर्थिक लुट होत आहे.
या मागचे कारण म्हणजे जळगाव शहरासह तालुक्यात तसेच ग्रामीण भागात मुन्नाभाई एम.बी.बी.एस.म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम थंडावलेली असल्याने राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे दिसून येते.
गेल्या तीन वर्षात तालुक्यात काही बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील नोंदविण्यात आले होते. त्यानंतर देखील बोगस डॉक्टरांचा वावर थांबलेला दिसत नाही. पश्चिम बंगालमधील काही तरूण शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर अघोरी, स्टेराँईड व विविध प्रकारच्या इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत. बहुतांश डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते सर्रासपणे ॲलोपॅथी प्रॅक्टीस करीत आहेत.
या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागात काही ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी घेतात. या बोगस डॉक्टरांचे बड्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांशी लागेबांधे असल्यामुळे हे त्यांच्याकडे आलेले रुग्ण या खाजगी रुग्णालयात रेफर करतात. त्यामुळे बड्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून या बोगस डॉक्टरांना काही रक्कम दिली जात असल्याचे काही डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
तसेच अधुनमधून वैद्यकीय पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी केली जाते,मात्र हे कळताच हे मुन्नाभाई एम.बी.बी.एस. डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात.
तसेच मागील वर्षी शासन निर्णयानुसार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटीची नियुक्ती करण्यात आली होती.व तालुकास्तरीय समितीने या समितीला मदत करणे अपेक्षित होते. तसेच ग्राम समितीला देखील कारवाईचे अधिकार दिले होते. मात्र, तसे झाले नाही.
तसेच सध्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टर आढळल्यास कारवाईचे आदेश नाहीत.या कारणास्तव
सद्यस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याच संधीचा फायदा घेत गाव व परिसरात वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर ॲलोपॅथी पध्दतीने उपचार करीत आहेत.
म्हणून आता जिल्हास्तरावरुन, तालुकास्तरावर तसेच गावागावात समिती नेमुन गावातील ग्राम समिती, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील. यांच्यामार्फत अशा वैद्यकीय व्यवसायिकांना मज्जाव करण्यात यावा. ग्रामसभा घेवून अशा लोकांवर आळा घालण्याबाबत उपाय योजना कराव्यात, गावाच्या फलकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी लावावी. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल व रुग्णांच्या जिवशी खेळला जाणारा खेळ थांबेल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.