पाचोरा तालुक्यात श्रीमंतांची मनमानी तर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४-०२/२०२१
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वदूर जमावबंदीचा आदेश असल्यावरही पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये कुठे श्रीमंतीच्या जोरावर तर कुठे धनदांडग्यांच्या व राजकीय लोकांच्या पाठबळावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडतांना दिसून येत आहेत.
यामागचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये कमी असलेले संख्याबळ व पोलिसांवर असलेल्या इतर जबाबदाऱ्या यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नाही. तर दुसरीकडे प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांच्यापर्यंत या घटनांची माहिती पोहचत नसल्याने हा प्रकार सुरू आहे.
मात्र ज्या गावात हा प्रकार घडत आहे तेथील सरपंच व पोलीस पाटील हे बघ्याची भुमिका घेतात तर काही कार्यक्रमात हे सामील होतांना दिसून येत आहेत.
तर दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्यपणे जिवन जगणारांना इच्छा असूनही छोटेखानी कार्यक्रमात चोरांसारखे कार्यक्रम पार पाडावे लागत आहेत.
या विवाह सोहळ्यात येणारे वऱ्हाडी मंडळी मुंबई, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व इतर मोठ्या शहरातून ग्रामीण भागात येत असल्याने वरीलपैकी बऱ्याच गावांची कोरोनाग्रस्थांची वाढणारी आकडेवारी लक्षात घेता शहरातील लोकांनी खेडेगावात येणे धोकादायक ठरणार असल्याने या विवाह सोहळ्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
तरी जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचे काटेकोर पालन झाल्यास नक्कीच आपण या भीषण संकटातून लवकरात लवकर बाहेर निघू म्हणून गावागावातील सरपंच व पोलीस पाटील यांना तश्या सुचना देऊन या कार्यक्रमांवर बंदी आणणे गरजेचे असून ज्या गावात नियमाचा भंग होईल अश्या ठिकाणी नियमभंग करणारी व्यक्ती व सरपंच, पोलीस पाटील यांना ही जबाबदार धरुन कारवाई व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.