मोठी बातमी! कोरोनाची वाढती संख्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले मोठे संकेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२१
राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे. त्यामुळं या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात डिसेंबरनंतर रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे ४ हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून आले.
रविवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ४०९२ वर पोहोचला होता. त्यामुळं ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली. परिणामी कोरोना रुग्णसंख्येचा हाच वाढता आलेख पाहता नागरिकांनीही कठोर निर्णयाच्या तयारीत राहावं असे संकेत अजित पवार यांनी दिले. मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी बैठक घेऊन यामध्ये चर्चेतून काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, त्यासाठी नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी असं पवारांनी नागरिकांना उद्देशून स्पष्टपणे सांगितलं. काही गोष्टींच्या बाबतीत वेळीच निर्णय न घेतल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं म्हणत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीला मिळालेल्या गंभीर वळणाचं चित्र जनतेपुढं ठेवलं.