दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२३

येत्या ०३ डिसेंबर २०२३ रविवार जागतिक अपंग दिनापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगला या शासकीय निवासस्थानासमोर आर. सी. आय. धारक १००% अंध १५० विशेष शिक्षक, कर्मचारी अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. श्री. विठ्ठल शालिकराम नवघरे यांनी दिली आहे.

या अन्नत्याग उपोषणाला बसण्याची वेळ आमच्यावर का आली याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण विभाग अंतर्गत मागील १७ वर्षांपासून प्राथमिक स्तरावर अल्प मानधन तत्वावर १७७५ विशेष शिक्षक कार्यरत आहेत. या १७७५ विशेष शिक्षकांमध्ये १५० विशेष शिक्षक, कर्मचारी हे १००% असून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी या सर्व १७७५ शिक्षकांसमवेत दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनापासून तर १० ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुध्दा केले होते.

यावेळी दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ रोजी शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिक्षक पद निर्मिती व पदभरती या विषयावर बैठक बैठक घेऊन शिक्षणमंत्र्यांनी सदरचा विषय घेण्यासाठी संबंधित विभागाला सुचवले होते. असे असले तरीही आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये १००% अंध १५० विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कुठेही नामोल्लेख करण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. तसेच मागील सहा वर्षांपासून संबंधितांच्या मानधनात एक पैश्याची सुध्दा वाढ करण्यात आली नाही. तसेच इतर कर्मचाऱ्यांना देय असलेले प्रवास भाडे, मदतनीस भत्ते सुध्दा या अंध कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेले नाहीत.

या सगळ्या विषयांवर न्याय मिळवून घेण्यासाठी दिनांक २०१८ मध्ये सुद्धा ५% आरक्षणानुसार समायोजन मिळणे संदर्भात मुंबई येथे १००% अंध विशेष शिक्षक, कर्मचारी यांनी आंदोलन व पुणे ते मुंबई लॉग मार्च काढण्यात आला होता. परंतु अद्यापही शासन व प्रशासनाकडून या १००% अंध, अपंग विशेष शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले नसल्याने आता सरतेशेवटी न्याय मिळवून घेण्यासाठी येत्या ०३ डिसेंबर २०२३ रविवार जागतिक अपंग दिनापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगला या शासकीय निवासस्थानासमोर आर. सी. आय. धारक १००% अंध १५० विशेष शिक्षक, कर्मचारी अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. श्री. विठ्ठल शालिकराम नवघरे यांनी दिली आहे.