डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंजूर झालेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी धरणे आंदोलनस्थळी ॲड. अभय पाटील संतप्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे बौद्ध धर्म बांधवांच्या सोयीनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव मंजूर करुन पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सन २०२२ मध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कायदेशीर मान्यता मिळवून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराच्या बांधकामांचे भुमिपुजन १४ एप्रिल २०२३ रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय महेंद्रजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. असे असले तरी काही कारणास्तव आजपावेतो सात महिने उलटले तरीही या प्रवेशद्वाराच्या बांधकामाची सुरवात करण्यात आली नसल्याने शिंदाड येथील बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व तत्सम जबाबदार पदाधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता ते टाळाटाळ करत आहेत.

म्हणून ज्या गावात महामानवाचा सन्मान होत नसेल अश्या गावत न रहाण्याचा निर्णय शिंदाड येथील बौद्ध बांधवांनी घेतला असून येत्या २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिनी शिंदाड येथील सर्व बौद्ध बांधव गाव सोडून जाणार असल्याचा निर्णय घेतला असून ज्या ठिकाणी महामानवाचा सन्मान होत असेल अश्या ठिकाणी आमचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

असे असले तरी आजपर्यंत सरपंच कुणाच्यातरी दबावाखाली येऊन या बाधकामाला सुरवात करत नसल्याने कमानीचे बांधकाम त्वरित व्हावे याकरिता कालपासून मा. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर बौद्ध बांधवांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिंदाड येथील रहिवासी ॲड. अभय दादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना शिंदाड येथील विध्नसंतोषी व यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी शेकणारांचा खरपूस समाचार घेतला यावेळी ते संतप्त झाले होते.

(याबाबत सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिंदाड येथील सरपंच व सदस्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नसल्याने लवकरच भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज प्रयत्नशील असुन शिंदाड हे गाव शांतताप्रिय, सुसंस्कृत लोकवस्ती असलेले गाव असून सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात म्हणून हा विषय शांततेच्या मार्गाने कसा सोडवता येईल याकरिता गावातील सरपंच, सदस्य व शिंदाड ग्रामस्थांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच बौद्ध समाज बांधवांनी अशी टोकाची भूमिका घेऊ नये असे मत शिंदाड येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.)

ब्रेकिंग बातम्या