माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्ष कार्यालयाचे उदघाटन संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१५/११/२०२०
शिवसेनेच्या आमदारांनी सोनिया मातेची शपथ घेऊन सत्तेच्या आणाभाका घेण्याआधी बाळासाहेबांची सेना आठवावी असा खोचक सल्ला देत या रामभरोसे सरकारला जनतेच्या प्रश्नाचे काहीच देणे घेणे नाही. त्याचे फळ त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मिळेल अशी चौफेर टीका माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पाचोर्यात केली. ते येथील पक्ष कार्यालयाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते.
आज आ. गिरीश महाजन यांच्याहस्ते पाचोरा येथे अटल भाजप कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार मंगेश चव्हाण, अमोल शिंदे, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, जि. प. सदस्य मधुकर काटे, डी. एम पाटील, सदाशिव पाटील, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, माजी सभापती बन्सीलाल पाटील, शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी राज्यातील सत्ताधार्यांवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी व शिवसैनिकांनी सोनिया मातेची शपथ घेऊन सत्तेच्या आणा भाका घेण्या आधी बाळासाहेबांची सेना आठवावी, राज्याचे प्रमुख व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोरोना काळात घरातुन बाहेर निघायला तयार नाहीत. भाषणे देऊन व ऑनलाइन संवाद साधून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे. सध्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात संजय राऊत यांची चापलूसी चालते त्यांनी ती थांबवावी, राज्यात पहिल्यांदाच निष्क्रिय व बेजबाबदार सरकार सत्तेवर आले आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने त्याचा मालक कोण? हे त्यांनाही सांगता येणार नाही. या रामभरोसे सरकारला जनतेच्या प्रश्नाचे काहीच देणे घेणे नाही. त्याचे फळ त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मिळेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे संदर्भात झालेली चुक मी मान्य करतो. परंतु पुढील काळात पाचोरा तालुका भाजपाच्या सत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल. अमोल शिंदे हेच आमदार असतील. कारण माझा शब्द मी खरा करतो व मी सांगितलेला आकडा ही फिट असतो; असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
याप्रसंगी पुढे बोलतांना आ. महाजन यांनी नुकताच भाजपचा त्याग केलेले एकनाथ खडसे यांचे नाव न घेता बोचरी टिका केली. ते म्हणाले, की पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. ज्यांची ती संस्कृती आहे; तेच तशी भाषा करतात. तसेच भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून तो विचारावर चालणारा पक्ष आहे. मी गेलो म्हणून संपले असे होत नाही. जाणारे जातात पण कुणाच्या जाण्याने काहीच संपत नाही. तर पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यावर त्यांनी नाव न घेता मी कधीच हजार पाचशे मतांच्या आघाडीने निवडून आलो नाही असा टोला लगावला तर जामनेर येथील त्यांचे परंपरागत स्पर्धक संजय गरुड यांचेसह ईश्वरलाल जैन यांच्यावर देखील बोचरी टीका केली.