पाचोरा सिंधी कॉलनी परिसरात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर घाणीचे साम्राज्य.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०५/२०२३
पाचोरा शहराच्या पूर्वेला सिंधी कॉलनी परिसरात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढीग (उकिरडे) पडले असून या कचऱ्याच्या ढगांमुळे सिंधी कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली असून याच उकिरड्यावर दिवसभर गायी, डुकरे, कुत्रे खाद्य शोधण्यासाठी दिवसभर एकत्रित होऊन संपूर्ण उकिरडा फैलावत असल्याने हा उकिरड्यावर असलेला कचरा थेट रहदारीच्या रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना व पायी चालणारांना नाविलाजास्तव या कचऱ्यावरुन जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे या उकिरड्यावर दिवसभर गायी, डुकरे व कुत्रे अन्न शोधत असतांना आपसात भांडणे होऊन हे प्राणी अचानकपणे रस्त्यावर धावत सुटतात यामुळे वाहनधारकांना विशेष करुन दुचाकीस्वाराला धडक देतात आजपर्यंत असे कित्येक अपघात होऊन दुचाकीस्वाराला दुखापत झाली आहे. हा कचरा येथून कायमस्वरूपी न हलवल्यास एखाद्यावेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कचरा उचलला जातो पण ?
पाचोरा सिंधी कॉलनी परिसरात आठवड्यातून ठराविक दिवशी नगरपरिषदेचे सफाई कामगार नियमितपणे घंटा गाडी घेऊन येतात परंतु सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी यांना प्रतिसाद देत नाहीत व मनमानी पद्धतीने पटेल तेव्हा व वाटले तेथे कचरा टाकुन मोकळे होतात. तसेच कचरा भरुन नेण्यासाठी सफाई कर्मचारी मोठी गाडी सोबत आणून कचरा भरतात परंतु हा कचरा भरतांना सरसकट न भरता काही प्रमाणात कचरा सोडून निघून जात असल्याने सिंध कॉलनी परिसरातील रहिवासी पुन्हा त्याच जागेवर कचरा आणून टाकत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी कचऱ्याचे ढीग पडून असतात.
“सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात यावेत”
तसेच दररोज सकाळी सिंधी कॉलनी परिसरात घंटा गाडी फिरवण्यात येते मात्र सिंधी कॉलनी परिसरातील नागरिक या घंटागाडीला प्रतिसाद न देता घरात साठवून ठेवलेला कचरा आपल्या मर्जीप्रमाणे मनात येईल तेव्हा मनाला वाटेल तेथे फेकत असल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची मेहनत वाया जात आहे. म्हणून नगरपरिषदेने या रस्त्यावर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार रहिवाशांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात असून हे ही. सी. टी. कॅमेरे पाचोरा शहरासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरतील असे रहिवाशांचे मत आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या वाटसरुंची नाराजी~
जामनेर, सोयगाव व पाचोरा तालुक्यातील बरेचसे लोक दैनंदिन कामानिमित्त दररोज पाचोरा शहरात येतात किंवा मालेगाव, मुंबई व इतर मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी याच रस्त्यावरुन प्रवास करतात कोणतीही व्यक्ती बाहेरगावी निघतांना डोक्यात सकारात्मक विचार व नवीन उत्साहाने घराबाहेर निघते मात्र रस्त्यावरुन जात असतांना पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून जातांना रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग पाहून नक्कीच नकारात्मकता निर्माण होते व पाचोरा नगरपरिषदे व सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात हे मात्र तेवढेच खरे.