भडगाव महसूल विभाग पैसे कमावण्याच्या मस्तीत, वाळू माफियाचे भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर घुसले नागरी वस्तीत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०४/२०२३
(ट्रॅक्टरच्या समोर फैजल भाई नाव असून हा फैजल भाई कोण या ट्रॅक्टर बद्दल उलट सुलट चर्चा सुरु असून महसूल विभागाने “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” अशी भूमिका घेतली असून “तेरी भी चूप मेरी भी चूप” झाकली मुठ लाखमोलाची ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचा चालक बदलण्यासाठी तसेच मागील तारखेची रॉयल्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीचा तपशील काढल्यावर वाळू माफिया व यांचे किती जवळचे संबंध आहेत हे दिसून येईल अशी माहिती एका जाणकार व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. )
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील नद्यांकडे सोन्याची खाण म्हणून पाहिले जाते कारण वाळूच्या व्यवसायातून लाखो नव्हे तर कोटीने पैसा कमावची नामी संधी म्हणजे अवैधरित्या वाळू वाहतूक करणे व विकणे म्हणून या व्यवसायात थेट तलाठी कार्यालयातील शिपाई, तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, तहसीलदार व वरिष्ठांपर्यंत साखळी तयार झाली असून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करुन लोखोची माया कमावली जात आहे. मग या वाळूच्या वाहत्या गंगेत काही स्थानिक पदाधिकारी व पुढारी सामील झाले आहेत. मग याचाच फायदा घेत नावापूरते हातात ओळखपत्र घेऊन फिरणारे कथीत वार्ताहर मग मागे कसे राहतील अश्या काही कथीत वार्ताहर या व्यवसायात स्वता उतरले आहेत तर काही खुशाली घेऊन हाताची घडी तोंडावर बोट ठेवून असल्याने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारांची हिम्मत वाढल्यामुळे दिवसाढवळ्या वाळू वाहतूक केली जात आहे.
असेच वाळू वाहतूक करणारे एक भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर दिनांक ०५ एप्रिल २०२३ बुधवार रोजी भडगाव तालुक्यातील अमडदे गावच्या गणपती नगरच्या वस्तीवर जाऊन धडकले ट्रॅक्टर इतके भरधाव वेगाने होते की हे ट्रॅक्टर गणपती नगरच्या वस्तीवर जाऊन धडकल्यावर तीन ते चार कच्च्या घरांची पडझड झाली व मोठा अपघात घडला या अपघातात गणपती नगरमधील रहिवासी कु. वैशाली बालु सोनवणे ही ११ वर्षे वयाची इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी जागीच ठार असून मयत वैशालीची लहान बहीण कु. पिंकी बालु सोनवणे वय वर्षे (०५) व शेजारी राहणाऱ्या बानूबाई वाघ वय वर्षे (४०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात घडला त्यावेळी थकून, भागून आलेले गणपती नगरचे रहिवासी साखर झोपेत होते व याच वेळी मोठा आवाज झाला आवाज ऐकून रहिवासी झोपेतून उठून घराबाहेर पळाले व समोरचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचे पाणी, पाणी झाले.
या अपघातात मयत झालेल्या की. वैशालीची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याकारणाने मयत वैशालीचे आईवडील हे मोलमजुरी करण्यासाठी बांबरुड येथे रहात आहेत तर मयत वैशाली व तिची लहान बहीण कु. पिंकी या अमडदे येथे त्यांच्या आजीकडे रहात होत्या या अपघातात कु. पिंकी व बानूबाई वाघ यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून इतर घरांच्या झालेल्या पडझडीने काही रहिवासी जखमी झाले होते या सगळ्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात स्थळावरुन पळून गेलेला ट्रॅक्टर चालक पिंटू (पूर्ण नाव माहीत नाही) याला ताब्यात घेतले असून अपघातातील ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे आहे याबाबत तपास करत असून अद्याप पावेतो ट्रॅक्टर मालकाचे नाव निष्पन्न झालेले नसल्याचे दिसून येते आहे. अपघाताची माहिती मिळताच भडगाव, अमडदे गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले तसेच भिल्ल समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो महिला व पुरुषांना सोबत घेत भडगाव पोलिस स्टेशनला धाव घेऊन भडगाव महसूल विभाग व ट्रॅक्टर चालकाविरुद्ध जोपर्यंत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत बालिकेवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाहीत असे जाहीर करत पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्री. संभाजीराव भोसले व भिल्ल समाज बांधवांनी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.