लोहारी येथे पाच लाखांची घरफोडी, घटनास्थळी डीवायएसपी भरत काकडेंची भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१२/२०२१
बनून आला पाहुणा आणी पाच लाखाचा लावला चुना. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील घटना.
पाठलाग बातमीचा.
पाचोरा तालुक्यातील लोहरी बुद्रुक येथील एकनाथ माणिक मगर (वय ५०) वर्ष यांच्या घरी कोणीही नसताना दिनांक १८ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून पाच लाखाची रोकड व एक गळ्यातील सोन्याची पोत लांबवली होती.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये तसेच त्यांचे सहकारी पो.कॉ. विजय माळी उपनिरीक्षक दिगंबर थोरात साहेब करत असून दिनांक १९ डिसेंबर रविवार रोजी डीवायएसपी मा.श्री. भरतजी काकडे यांनी चोरी झालेल्या घरी व घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचे बारकाईने निरीक्षण व चौकशी केली. व संबधितांना मार्गदर्शक सुचना केल्या.
तसेच संबधित चोराला शेजारील एका आजीबाईंनी त्या चोरट्याला पाहिले होते, त्या आजीबाईशी सविस्तर चर्चा करू माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पुढील तपासासाठी घटनास्थळी फिंगर प्रिंट तज्ञ यांना बोलावून फिंगर प्रिंट घेतले आहेत. तसेच गुन्हेगाराचा ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
या चोरीमध्ये संबंधीत चोरट्याने एकनाथ माणिक मगर हे घरी नसतांना व त्यांची मुलगी कॉलेजला गेलेली असतांना बंद घराची चाबी घराच्या बाहेर ओट्यावर एका कोपऱ्यात ठेवलेली होती. ती काढून घरात घुसून घरातील कपाट उघडून, कपाटातील साडीत कपाटाच्या लॉकरची लपवलेली चाबी व्यवस्थित पणे काढून कपाटाच्या लॉकर मधील पाच लाख रुपयांची रोकड व एक गळ्यातील पोत चोरून नेली आहे.
ही चोरी करत असतांना शेजारच्या आजीबाईंनी त्याला हटकले असता मी या घरी पाहुणा आलो आहे असे हिमतीने सांगून घरात घुसून चोरी केली असल्याने व घरातील व्यक्तींची पूर्ण माहिती असल्याने न घाबरता चोरी केली असल्याचे दिसून येते. यामुळे संबंधित चोर एकनाथ मगर यांच्या घरावर पाळत ठेवून होता किंवा एकनाथ मगर यांच्या ओळखीचा असावा अशी चर्चा लोहारी गावातील नागरिकांमध्ये सुरू होती.
कारण संबंधित चोरट्याने दिवसाढवळ्या शेजारील आजीबाई यांनी हटकल्यावर सुध्दा कुठेही शोधाशोध न करता सरळसरळ ओट्यावर ठेवलेली चाबी घेऊन तसेच घरात गेल्यानंतर लॉकरची चाबी शोधण्यासाठी कोणत्याही सामानाची फेका, फेक न करता ठरावीक ठिकाणी ठेवलेली चाबी व्यवस्थितपणे काढून शांततेत पाच लाख रुपये व एक सुरु सोन्याची पोत काढून पोबारा केला आहे.
म्हणजेच संबंधीत चोरट्याला या घरातील लोकांच्या दैनंदिन हालचाली माहीत होत्या. तसेच घरातील आर्थिक व्यवहार तसेच घरातील पैसे ठेवण्यासाठी असलेली ठिकाण माहीत होते असे लक्षात येते. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये हे बारकाईने तपास करत आहेत.