पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर अवैध वाहतूक बोकाळली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२२
पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर रिक्षा चालकांनी कहर केला असून प्रवाशांची वाहतूक करतांना सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे अवैध वाहतूक करुन प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. विशेष म्हणजे ज्या रिक्षातून प्रवासी वाहतूक केली जात आहे ती वाहने जुनी व जिर्ण झालेली असून काही रिक्षा मोडकळीस आलेल्या आहेत. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांजवळ वाहनांची कागदपत्रे नसून वाहन चालवण्यासाठी लागणारा परवान सुध्दा नसल्याचे दिसून येते कारण या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांपैकी बरेचसे रिक्षा चालक हे अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे ही अवैधरित्या प्रवासी वाहतूक करतांना कमी श्रमात व कमी खर्चात जास्तीत, जास्त पैसा कमावण्यासाठी रिक्षाचालक व मालक हे रिक्षातून प्रवासी वाहतूक करतांना टपावर बसवून तर मागील बाजूस लटकवून (उभे करून) तसेच चालकाच्या दोघ बाजूला दोन, दोन प्रवासी बसवून बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करुन प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.
या अवैध वाहतूकीत आजपर्यंत बरेचसे अपघात होऊन काही प्रवाशांना अपंगत्व आले असून काहींनी आपला जीव गमावला आहे. परंतु अपघात झाल्यानंतर प्रकरण परस्पर मिटवली जात असल्याने कारवाई करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत. म्हणून आता राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून ही जीवघेणी प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.