दोन वर्षांपूर्वी बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या फरार आरोपींना पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२२
बनावट लग्न लावून फसवणूक होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. असेच बनावट लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला सन २०२० मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २४८ भारतीय दंड विभाग ४२०, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून या बनावट लग्न प्रकरणातील दोन वर्षांपासून तीन संशयित आरोपी फरार झाले होते. या आरोपींचा पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब व त्यांचे सहकारी कसोशीने तपास करीत असतांनाच त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस हवालदार मा. श्री. रणजित पाटील, पोलीस शिपाई पंकज सोनवणे, पोलीस शिपाई योगिता ताई चौधरी यांचें पथक तयार करुन पाठवण्यात आले होते.
या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुलढाणा जवळील चिखली या गावात जाऊन गोपनीय रीत्या पुजा राम ठाकरे, चंद्रकला राम ठाकरे व अमोल सुरसे या आरोपींना शिताफीने अटक करुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला आणले आहे. याबाबत संबंधित संशयित आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील सदर मुलीचे याअगोदर चार ठिकाणी लग्न लावून इतरांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे अटक करुन आणले असल्याची माहिती समोर येताच अनेकांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन गाठले व पोलीसांचे कौतुक करत आभार मानले आहेत.