अंबे वडगाव येथील सांड गायीचा सर्पदंशाने मृत्यू, गाव परिसरातून हळहळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील अंबिका देवीचा नवस फेडण्यासाठी सोडलेल्या (सांड) गायीचा दिनांक १२ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अंबे वडगाव येथे अंबिका देवीचे मंदिर असून हे गावाही देवीच्या नावानेच म्हणजे अंबे वडगाव नावानेच ओळखले जाते. या जागृत देवस्थान असलेल्या अंबिका देवीवर पंचक्रोशीतील जनतेची श्रध्दा आहे. म्हणून गावातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांकडून या देवीला नवस बोलले जातात व मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडले जातात अश्याच प्रकारे काही वर्षांपूर्वी एका भाविकभक्तांने अंबिका देवीच्या नावाने एक गाय सोडली होती.
ही अंबिका देवीच्या नावाने सोडलेली गायीने जणूकाही प्रत्येक घराघरातून सदस्यत्व घेतले होते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण अंबे वडगाव गावातील प्रत्येक घरातून या गायी साठी दररोज एक पोळी किंवा भाकरी जास्तीची बनवली जात होती. व प्रत्येक घरातील गृहिणी या गायीची वाट पहात असायची व गाय सुध्दा गावातील घराघरा जवळ जाऊन प्रत्येक घरातून पोळी, भाकरी खायची गाय घरासमोर आली म्हणजे प्रत्येक गृहिणी गायीची पुजा व नमस्कार केल्याशिवाय पोळी, भाकरी खाऊ घालत नसे.
अशीच ही देवीच्या नावाने सोडलेली गाय आजरोजी शेतात चरण्यासाठी गेली असता तीला सर्पदंश झाल्याने त्यात ती मृत झाली. ही वार्ता गावात माहीत पडताच सर्व गावकऱ्यांनी व महिलांनी घटनास्थळी धाव घेऊन हळहळ व्यक्त करत अंतिम दर्शन घेतले व गावकऱ्यांनी गायीचा दफनविधी पार पाडला. या घटनेमुळे आज गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.